चिपळूण (प्रतनिधी) : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण प्रशालेत शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेद या हितैषी उपक्रमांतर्गत वनौषधी हा विषय इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली ३८ वर्षे सुरु आहे. २२ जून रोजी सालाबादप्रमाणे वनौषधी विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी या उपक्रमासाठी झटणारे डॉ. रत्नाकर थत्ते यांनी ध्यान व प्रार्थनेनी केली. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन केले. त्याचवेळी इयत्ता नववीच्या मुलींनी स्वागतगीत सादर केले. मुख्याध्यापक संजय बनसोडे व उपमुख्याध्यापिका सौ. रेवती कारदगे यांनी प्रमुख अतिथी वैद्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर थत्ते व नीमाचे अध्यक्ष डॉ.चैतन्य खोत यांचे पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. मानसी पेढांबकर यांनी आयुर्वेदाचा अर्थ आयुष्याचे ज्ञान असून आयुर्वेदाचा मुख्य उद्देश रोग बरे करणे व निरोगी व्यक्तिचे आरोग्य टिकवून ठेवणे हे स्पष्ट केले. मागील शैक्षणिक वर्षातील अक्षता माटोरे व इतर ५ विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना हा विषय आमच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून बालवयातच आयुर्वेदाची माहिती मिळाली व भविष्यात याचा खूपच फायदा आम्हांला होणार आहे असे सांगितले.
डॉ . रत्नाकर थत्ते व डॉ . चैतन्य खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात व निरोगी आरोग्य मिळविण्यासाठी दिनचर्या खूप महत्वाची आहे असे विचार मांडले. मुख्याध्यापक संजय बनसोडे यांनी वनौषधी विषय प्रशालेत यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत याची खात्री दिली. पर्यवेक्षक भगवान खाडे व संदीप मुंढेकर यांनी कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. विशाल कदम व सौ. सुजाता माने यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला. विभाग प्रमुख सौ .मानसी पेढांबकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.













