मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातप्रकरणी गुरे मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

देवगड | प्रतिनिधी

 

देवगड-निपाणी महामार्गावर १० जुलै २०२६ रोजी मोकाट गुरामुळे झालेल्या भीषण अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित गुरे मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

भारतीय जनता पक्षाचे देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील गटनेते तथा नगरसेवक शरद रामचंद्र ठुकरूल यांनी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अपघात हा गुरे मालकाच्या निष्काळजीपणामुळे घडला असून, त्या अपघातात एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. त्यामुळे या मृत्यूस संबंधित गुरे मालकच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

यापूर्वीही देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रशासनाने मोकाट गुरांच्या मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यानुसार कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित बेजबाबदार गुरे मालकाचा शोध घ्यावा आणि त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शरद ठुकरूल यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

दरम्यान, देवगड तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

 

यावेळी यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, देवगड-जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, बुवा तारी, रोहन खेडेकर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, प्रियांका साळस्कर भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजयुमो शहराध्यक्ष दयानंद पाटील, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.