सावंतवाडी येथील कै. सुधाताई कामत शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक यश

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून कौतुक तर शाळा इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्याची शिक्षण सभापतींची ग्वाही

सावंतवाडी:येथील कै. सुधाताई कामत शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या अभूतपूर्व यशाचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी नुकतीच शाळेला विशेष भेट दिली. यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षकांचा भेटवस्तू देऊन गौरव केला.

याप्रसंगी बोलताना शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी, कै. सुधाताई कामत शाळेने केलेली ही कामगिरी जिल्ह्यातील इतर सर्व शाळांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच गेल्या काही काळापासून रखडलेले शाळा इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शाळेच्या एकजुटीचे कौतुक केले. ते म्हणाले, “जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी या शाळेतील सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी एकजुटीने काम करीत आहेत. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळेच शाळेने हे भव्य दिव्य यश मिळविले आहे.” शाळा इमारतीच्या बांधकामाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे काम लवकरच पूर्ण केले जाईल. तसेच नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत जिल्हा परिषद स्तरावरून भाडे मंजूर करून, पर्यायी जागेसाठी भाड्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या ऐतिहासिक यशाचे मुख्य शिल्पकार असलेल्या शिक्षकांच्या पाठीवरही अध्यक्षांनी शाबासकीची थाप दिली. शिक्षकांनी केलेली ही कामगिरी खरोखरच अभूतपूर्व असून, या सर्व गुणवंत शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येईल, असे प्रमोद कामत यांनी जाहीर केले.

या कौतुक सोहळ्याप्रसंगी वाफोलीचे उपसरपंच श्री. गवस, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, ॲड. संजू शिरोडकर, नंदू गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्षा मीना दाभोलकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांनी केले.