रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील सफारी एशिया हॉटेलजवळ किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाने एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्याची घटना १५ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन सुरेश मोरे (४१, रा. रंजना रेसिडेन्सी, ए विंग, रूम क्र. १०२, सवाजीनगर, नाचणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच-०८-ईजी-५१९३ क्रमांकाच्या रिक्षाच्या अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळी 6.30 वा. सुमारास सफारी एशिया हॉटेललगत कोकणनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर फिर्यादी हे मित्र रफीक याच्याशी बोलत उभे असताना शेजारी उभ्या असलेल्या रिक्षाच्या चालकाने कोणतेही कारण नसताना त्यांची मान पकडून रस्त्यावर पाडले. त्यानंतर रस्त्यावरील दगड डोक्याच्या डाव्या बाजूस मारून त्यांना दुखापत केली. या हल्ल्यात रोशन मोरे जखमी झाले असून शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.











