आ. निलेश राणे यांची ठोस भूमिका; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने चिपळूणच्या अर्धवट उड्डाणपुलाच्या प्रश्नाला गती

पाग पॉवरहाऊस परिसरातील वाढते अपघात थांबविण्यासाठी हालचाली
खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार
उड्डाणपूल पाग रेस्ट हाऊसपर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी सकारात्मक चर्चा

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा, मात्र अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडलेला उड्डाणपूल आजही शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपूल अपूर्ण असल्यामुळे पाग पॉवरहाऊस परिसरासह शहरातील विविध ठिकाणी सातत्याने अपघात घडत असून, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाला न्याय मिळावा आणि उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्णत्वास यावा, या उद्देशाने चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची भेट घेण्यात आली.

\या भेटीवेळी ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते बापूशेठ काणे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक परिमल भोसले तसेच शिवसेनेचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सर्वेश सुर्वे उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी उड्डाणपूल अपूर्ण असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात, पाग पॉवर हाऊस परिसरातील धोकादायक परिस्थिती तसेच शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांची सविस्तर माहिती आमदार निलेश राणे यांच्यासमोर मांडली.

चिपळूणसारख्या वाढत्या शहरासाठी हा उड्डाणपूल केवळ विकासाचा प्रकल्प नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा उड्डाणपूल पाग रेस्ट हाऊसपर्यंत पूर्णत्वास नेण्याची मागणीही करण्यात आली. या मागणीची गंभीर दखल घेत आमदार निलेश राणे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चिपळूणच्या या रखडलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे चिपळूणकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्येक दिवशी हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा होणारा मनस्ताप लक्षात घेता हा उड्डाणपूल तातडीने पूर्ण होणे ही काळाची गरज बनली आहे. आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नावर दाखविलेली तत्परता आणि नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे चिपळूणकरांच्या या बहुप्रतीक्षित मागणीला आता निश्चितच गती मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन चिपळूणकरांना सुरक्षित, सुसज्ज आणि अखंड वाहतूक व्यवस्था मिळावी, हीच संपूर्ण शहरवासीयांची अपेक्षा आहे.