लांजा न.पं.प्रशासना विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत

नियमबाह्य पद्धतीने लादलेल्या डंपिंग ग्राउंड अन्य ठिकाणी करावा या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी उपोषण

लांजा (प्रतिनिधी) वस्तीलगत नियमबाह्य पद्धतीने लादलेला घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्प अन्य ठिकाणी करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असून याबाबतचे निवेदन आज मंगळवारी लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले.
दरम्यान, १४ऑगस्ट २०२५ पासून सलग ९३ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करून देखील अद्यापही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे प्रशासनाच्या गैर कारभाराविरोधात, नियमबाह्य प्रस्ताव व खरेदीखत करणाऱ्या नगरपंचायत लांजा मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांची खातेनिहाय सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोत्रेवाडी वस्तीजवळ घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) साठी प्रस्तावित केलेली जागा व त्या जागेसाठी घेण्यात आलेला प्रस्ताव हा मुळातच चुकीचा आहे .प्रस्तावात अनेक त्रुटी असून शासनाच्या कोणत्याही निकषात बसत नसताना देखील ही जागा, अटी शर्तींचे उल्लंघन करून घेतलेली आहे. सदर प्रस्तावित क्षेपण भूमी जागेची शासनाच्या जिल्हा कमिटीने प्रत्यक्ष पाहणी करून घनकचरा नियम २०१६ च्या निकषात बसत नसल्याने प्रस्ताव अयोग्य ठरवलेला आहे.‌ तसे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे निर्देशानुसार प्र.‌
जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनी मुख्याधिकारी लांजा यांना दिनांक १७.०२.२०२१ रोजी पत्र दिलेले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांनी दिनांक २६.३.२०२१ रोजी च्या पत्रान्वये कोत्रेवाडी ग्रामस्थांना लेखी पत्र दिलेले आहे. त्या पत्रामध्ये सदर प्रस्ताव रद्द झाल्याचे स्पष्ट नमूद आहे .तरीही प्रशासनाने पुन्हा तोच नियमबाह्य प्रस्ताव घेऊन चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल केलेली आहे.
शासनाच्या नियमानुसार कचरा गोळा करून लोकवस्ती पासून दूर अंतरावर त्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचे धोरण असताना ‌ लांजा नगरपंचायत मात्र कोत्रेवाडी वस्तीलगत नियमबाह्य जागा घेऊन त्याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्याचा अट्टाहास का करत आहे ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.‌प्रशासनाने शासनाच्या स्वच्छ अभियानाचा सखोल विचार करून कोत्रेवाडी वस्तीजवळ होणारा कचरा प्रकल्प आरोग्यास हानिकारक असल्याने तो अन्य ठिकाणी, लोकवस्ती पासून दूर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोत्रेवाडी येथील नियोजित जागेला रस्ता नसताना, प्रस्ताव रद्द असतानाही नियोजित जागेचे प्रस्ताव व खरेदी खत करणाऱ्या संबंधित मुख्याधिकारी त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात लांजा तहसील कार्यालयासमोर ९३ दिवस साखळी उपोषण केले होते. तरी दखील आम्हाला न्याय मिळत नसेल तर नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने पुढील टोकाचे पाऊल उचलावेच लागेल आणि त्याला सर्वस्वी प्रशासनाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.‌
सदरचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांना सादर करण्यात आले. याबरोबर लांजा पोलीस ठाणे, लांजा नगरपंचायत, यांना देखील हे निवेदन सादर करण्यात आले आहे.