तहसीलदार सौ. अमृता साबळे यांची यशस्वी मध्यस्थी; उपसभापती प्रफुल्ल बाईत यांचेही प्रयत्न फळाला
देवरूख (प्रतिनिधी):
पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शुक्रवारी मागे घेण्यात आले आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौ. अमृता साबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना ठोस लेखी आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी या आंदोलनावर पडदा पडला.
गेल्या तब्बल पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या पाच कुटुंबांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन छेडले होते. या गंभीर समस्येची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली करत उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. सार्वजनिक विहिरीतून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्या पाईपलाईनवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४९ अन्वये कारवाईची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे.
याप्रकरणी आवश्यक ती सर्व सुनावणी पूर्ण करून १४ ऑगस्ट २०२६ पूर्वी योग्य व नियमानुसार ठोस निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेली मुदत संपण्यापूर्वी प्रश्नाचा कायमस्वरूपी निवाडा न झाल्यास यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी तहसीलदार अमृता साबळे, प्रभारी गटविकास अधिकारी अक्षय पाटील, पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, रूपेश कदम यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि येडगेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












