बंद दुकानात घेतला आसरा; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
देवरूख (प्रतिनिधी)
देवरूख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका बंद दुकानाच्या जागेत मोकाट गुरांनी आसरा घेतल्याचे चित्र समोर आले आहे. भर पावसाळ्यात शहरातील बाजारपेठ आणि परिसरात मोकाट कुत्र्यांबरोबर गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मोकाट गुरे दिवसभर शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठेत मुक्तपणे फिरताना दिसतात. अनेकदा ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय, मोकाट गुरांकडून परिसरातील शेतपिकांचेही नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पादचाऱ्यांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद दुकानात मोकाट गुरांनी आश्रय घेतल्याने परिसरात अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या समस्येकडे संबंधित देवरुख नगरपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरांच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.












