लेखणीला मिळाला लोकभानाचा सन्मान; सागर चौगले यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्कार

*पन्हाळा प्रतिनिधी* 

 *प्रतापसिंह काळे* 

 

ग्रामीण भागातील माणसांच्या जगण्याचे प्रश्न कागदावर उतरवणे म्हणजे केवळ बातमी लिहिणे नव्हे, तर त्या प्रश्नांना आवाज देणे असते. गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून हीच भूमिका जपणारे माजगाव (ता. पन्हाळा) येथील पत्रकार सागर वसंतराव चौगले यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे.ग्रामीण भागातील रस्ते, शिक्षण, सामाजिक प्रश्न, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी यांचा सातत्याने पाठपुरावा करत चौगले यांनी पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. गावातील एखादा प्रश्न प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचवताना त्यामागे असलेली माणसांची व्यथा त्यांच्या वृत्तांकनातून अनेकदा पुढे आली.

 

पन्हाळा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण वृत्तांकन केले. केवळ प्रश्न मांडण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपल्या लेखणीला जनहिताचे साधन बनवले. परिसरातील लोकचळवळी आणि सामाजिक उपक्रमांनाही त्यांच्या पत्रकारितेतून बळ मिळाले.

पत्रकारिता ही केवळ घटनांची नोंद नसून समाजाच्या वेदनांना शब्द देण्याचे माध्यम आहे, याची जाणीव ठेवून केलेल्या त्यांच्या कामाची दखल या पुरस्काराच्या रूपाने घेतली गेली आहे.जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या या पुरस्कारामुळे सागर चौगले यांच्या पत्रकारितेचा सन्मान झाला असून, त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.