दिवसा शिक्षण, रात्री अभिनय; स्त्री पात्र साकारत रंगमंच गाजवणारा कलाकार श्लोक देवरुखकर

शिवशंभो नमन मंडळाच्या वतीने झाला १० वर्षीय श्लोक देवरुखकरचा सन्मान

देवरूख (प्रतिनिधी)

दिवसा शिक्षण आणि रात्री रंगमंचावर अभिनय करून स्वतःचे कलाविश्व समृद्ध करणारे अनेक हरहुन्नरी कलाकार आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी, आणि नोकरदार लोक कलेची आवड जपण्यासाठी दिवसा आपली शाळा, महाविद्यालय किंवा नोकरी सांभाळतात आणि रात्री तालमी किंवा प्रयोग करून रंगभूमी गाजवतात.

कोकणच्या मातीत रुजलेली लोककला आजही नव्या पिढीच्या माध्यमातून जिवंत असल्याचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेनवडे येथील अवघ्या १० वर्षीय श्लोकने आपल्या दमदार नमन नृत्य सादरीकरणातून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याच्या अप्रतिम कलाविष्काराची दखल घेत १६ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा विशेष सन्मान करण्यात आला
श्लोक याने प्रथमच नमन कलेच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केले पहिल्याच हंगामात त्याने ४० प्रयोग केले या प्रयोगात त्यानें विविध प्रकारच्या ४ भूमिका साकारल्या होत्या आणि त्या भूमिकेला रसिकांनी भरभरून दाद दिली
श्लोक सध्या प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे

काही दिवसांपूर्वी मुंबई येथे संगमेश्वर तालुक्यातील शिवशंभो नाट्य नमन मंडळाचे सादरीकरण झाले होते. या नमन कार्यक्रमात श्लोकने ‘गौळणी’ची स्त्री भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने साकारत उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्याच्या हावभाव, अभिनय आणि नृत्यकौशल्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली. या सादरीकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, श्लोकच्या कलेचे सर्व स्तरातून आजही कौतुक होत आहे. प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारा श्लोक लहानपणापासूनच कला क्षेत्राकडे आकर्षित झाला आहे. नृत्य, अभिनय आणि पारंपरिक लोककलेची आवड असल्याने त्याने नमनकलेत प्रवेश केला. कमी वयातही त्याने केलेली मेहनत, आत्मविश्वास आणि रंगमंचावरील सहज वावर यामुळे तो अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

श्लोकने सांगितले की, आपली लोककला टिकून राहिली पाहिजे म्हणून मला नमनमध्ये सहभागी व्हायचे होते. मी घरी याबाबत सांगितले. त्यांनी मला लगेच प्रोत्साहन दिले. माझ्या आईने आणि माझे मामा संयोग यांनी एक महिना माझी तालीम घेतली. रंगमंचावर कला सादर करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आज मला जो शिवशंभो नमन मंडळाने विशेष सन्मान केला त्या बद्दल मी त्यांचें आभार मानतो आणि हा माझ्या आयुष्यातील पहिलाच सन्मान आहे तो मी माझ्या रसिकांना सर्मिपीत करतों असे उद्गार श्लोक ने काढले. श्लोकच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि लोककलेबद्दलची आवड यामुळे या चिमुकल्या कलाकाराने एवढ्या कमी वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र श्लोकचा हा कलाविष्कार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कोकणच्या समृद्ध लोककला परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या नव्या पिढीची आशादायी झलक दाखवणारा ठरत आहे.