सुरक्षित आर्थिक व्यवहार, बचत व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
मालवण | प्रतिनिधी : नागरिकांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम व केसीसी कॅम्प वायरी येथील रामदास स्वामी मठ येथे आयोजित करण्यात आला. धान फाउंडेशनअंतर्गत आर्थिक साक्षरता केंद्र, मालवण तसेच मत्स्यविभाग, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला अग्रणी जिल्हाधिकारी (LDO) श्रीमती बेनाझिर शेख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (LDM) ऋषिकेश गावडे आणि DDM-नाबार्ड दिपाली माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी नागरिकांना केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना बँकिंग सेवा, डिजिटल बँकिंग, आर्थिक सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, आर्थिक नियोजन, बचत, विमा तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, तसेच आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात धान फाउंडेशनचे समन्वयक अमित कदम, असोसिएट दीपसंदेश पाटील, मालवण परवाना अधिकारी श्री. टेमकर, सागर मित्र नूतन तोडणकर, वैभवी देसाई, विनीत मंडलिक आणि प्रतीक्षा पाटकर यांनी प्रमुख भूमिका बजावली. कॅम्पच्या आयोजनासाठी रापण संघ सोसायटीचे अध्यक्ष दिलीप घारे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी नागरिकांनी आर्थिक साक्षरता आत्मसात करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला वायरी गावातील महिला तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.












