ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत राजापूर तालुक्यातील तळगाव येथे सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बनावट दारूच्या मिनी कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग भरारी पथकाने तळगाव येथे छापा टाकत तब्बल १ कोटी रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि संबंधित साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.
या कारवाईदरम्यान जागा मालक दिनेश जैतापकर आणि गोव्यातील चंदन पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोवा बनावटीच्या दारूची नक्कल करून ती तयार करण्यासाठी या ठिकाणी मिनी कारखाना सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.











