सेवा संकल्प अभियानांतर्गत तिलारी धरण परिसरात विद्युत रोषणाई आणि पर्यावरणपूरक दीपोत्सव

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

दोडामार्ग:सुहास देसाई

राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जलसाठ्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि जनजागृतीसाठी शासनाने दिलेल्या विशेष मार्गदर्शक सूचनांचे पालन करत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मुख्य धरण तसेच खळग्यातील दगडी धरण परिसरात दीप प्रज्वलन, वृक्षारोपण व विद्युत रोषणाईचा उपक्रम राबविण्यात आला. जलसाठ्यांच्या ठिकाणी जलप्रदूषण रोखणे, पारंपरिक मातीच्या पणत्यांचा वापर करणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि सुरक्षित पद्धतीने विद्युत रोषणाई करणे या शासकीय सूचनांनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तिलारी मुख्य धरणावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि दक्षिण कोकण सिंचन प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानाची ‘सेवा ज्योत’ म्हणून दीप प्रज्वलित करण्यात आला. जलसाठ्याचे पावित्र्य आणि संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते धरण परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांनी खळग्यातील दगडी धरणाला भेट दिली. या ठिकाणीही दीप प्रज्वलन करून सुरक्षितता व नियमांचे काटेकोर पालन करत उभारण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या रोषणाईमुळे दगडी धरणाचा परिसर उजळून निघाला होता. अभियानाच्या सूचनांनुसार जलसाठ्यांचे रक्षण व संवर्धन करण्याची सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, उप कार्यकारी अभियंता महादेव दळवी, उपविभागीय अभियंता संतोष कविटकर, उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे, कनिष्ठ अभियंता प्रवीण पेडणेकर, तुषार पेडणेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.