दोडामार्ग महावितरण कार्यालयाबाहेर ‘पीएम सूर्य घर’ योजनेचा विशेष स्टॉल; उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचे आवाहन

दोडामार्ग: सुहास देसाई

 

केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ अंतर्गत महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट योजना २०२५’ ची माहिती सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोडामार्ग महावितरण कार्यालयाबाहेर एका विशेष स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी यावेळी केले.

या स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना घराच्या छतावर सौरऊर्जा (रुफटॉप सोलर) प्रकल्प कसा बसवावा, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, योजनेचे पात्रता निकष आणि अर्जाची प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

अनुदानाचे स्वरूप व वर्गवारीनुसार ग्राहक हिस्सा:

१ किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलर सिस्टिमची आधारभूत किंमत ५०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून ३०,००० रुपयांचे अनुदान मिळते, तर उर्वरित रकमेसाठी राज्य शासनाकडून प्रवर्गनिहाय अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे:

दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्राहक: केंद्र अनुदान ३०,००० रु. + राज्य अनुदान १७,५०० रु. = एकूण अनुदान ४७,५०० रुपये. (ग्राहकाला फक्त २,५०० रुपये भरावे लागतील.)

अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) ग्राहक: केंद्र अनुदान ३०,००० रु. + राज्य अनुदान १५,००० रु. = एकूण अनुदान ४५,००० रुपये. (ग्राहकाला फक्त ५,००० रुपये भरावे लागतील.)

सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय (OBC) ग्राहक: केंद्र अनुदान ३०,००० रु. + राज्य अनुदान १०,००० रु. = एकूण अनुदान ४०,००० रुपये. (ग्राहकाला फक्त १०,००० रुपये भरावे लागतील.)

शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेमुळे वीज बिलात मोठी बचत होणार असून नागरिकांनी महावितरणच्या स्टॉलला भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे उपसभापती गवस म्हणाले.

या कार्यक्रमाला सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, संजय सातार्डेकर, सायली निंबाळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.