देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख भायजेवाडी येथील शांताराम, रामचंद्र, विनायक व संतोष शिंदे बंधूंचा गणपती बाप्पा म्हणजे ”शिंद्यांचा राजा’. प्रतिवर्षी ‘शिंद्यांचा राजाची’ प्रतिष्ठापना श्री गणेश चतुर्थीला होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव सुरू असतो. गेली अनेक वर्ष नाविन्यपूर्ण सजावट हे या बाप्पाचे वैशिष्ट्य असते, शिंदे कुटुंबातील तीन पिढ्यातील सर्व लहानथोर मंडळी स्वतः ही आकर्षक सजावट गेली अनेक वर्ष करत आहेत. शिंदे कुटुंबीयांमधील उमेश, दिनेश, रमेश, महेश, रवींद्र, मिलिंद आणि प्रथमेश ही तरुण पिढी आता आकर्षक सजावटीची जबाबदारी अतिशय मेहनतीने सांभाळत आहेत.
यावर्षीची सजावटही दर वर्षाप्रमाणे आकर्षक असून, यावर्षी शिंदे कुटुंबीयांनी गणपती बाप्पांना राजमहालात स्थानापन्न केले आहे. यामध्ये खिडक्या व भिंतीवर नक्षीदार उत्तम कोरीव काम आणि भिंतीवरील देवळ्यांमध्ये छोट्या पणत्यांची(दिव्यांची) केलेली सुंदर रचना बाप्पांच्या महालाची शोभा वाढवित आहेत. गणेशोत्सवाच्या या १२ दिवसात आरत्या, भजन, टिपऱ्या, गोफ तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम यांची रेलचेल याठिकाणी असते. शिंदे परिवारातील विविध सदस्य नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असले, तरी गणेशोत्सव व इतर पारंपारिक सणाला एकत्र येऊन मोठ्या आनंदाने सण व उत्सव साजरे करतात. शिंदे कुटुंबाकडे पाहिल्यानंतर या आधुनिक काळातही एकत्र कुटुंब पद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे निदर्शनास येते.












