निवडणूक आयोगावर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा!
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची टीका
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
निवडणुकीत विजय मिळाला की निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विश्वास आणि पराभव झाला की त्याच आयोगावर गंभीर आरोप, अशी दुटप्पी भूमिका घेऊन जनतेमध्ये संविधानिक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधींकडून निवडणूक आयोगासह संविधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे एका ठरावीक ‘नॅरेटिव्ह’चा भाग असल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला.
राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रमोद कामत आणि प्रभाकर सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
कर्नाटक, तेलंगणा, हिमाचलमध्ये विजय मिळाला तेव्हा आयोग चांगला होता का?
कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला विजय मिळाला, त्यावेळी निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. मात्र, भाजपच्या विजयाच्या वेळी प्रत्येक निवडणुकीनंतर आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे प्रमोद कामत आणि प्रभाकर सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.
निवडणुकीचा निकाल आपल्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही म्हणून संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले.
हातात संविधान अन् संविधानिक संस्थांवरच अविश्वास? राहुल गांधी वारंवार हातात संविधानाची प्रत घेऊन राजकीय भूमिका मांडतात. मात्र, त्याच संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्थेतील संविधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका योग्य कशी, असा सवाल भाजपने केला.
निवडणूक आयोग ही देशातील लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची संविधानिक संस्था आहे. या संस्थेबाबत आक्षेप असतील तर ते कायदेशीर आणि तथ्यांच्या आधारे मांडले जावेत. मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षापूर्वी जनतेमध्ये संस्थेविषयी अविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने आरोप करणे योग्य नाही, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली.
कॅबिनेट सचिवांच्या पत्राचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप
कॅबिनेट सचिवांकडे पाठविण्यात आलेल्या पत्राच्या मुद्द्यावरूनही भाजपने राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली. संबंधित पत्र कोणत्याही धोरणात्मक निर्णयाशी किंवा निवडणूक आयोगाच्या IT विभागाशी संबंधित नसून, प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या कामकाजासंदर्भात असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
या पत्राला निवडणूक प्रक्रियेशी जोडून त्यातून वेगळे राजकीय चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रमोद कामत आणि प्रभाकर सावंत यांनी केला.
फॉर्म क्रमांक ६ वरूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म क्रमांक ६ संदर्भातील मुद्द्यांवरूनही जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबरच्या स्पष्टीकरणात SIR कालावधीतील फॉर्म ६ संदर्भातील घोषणेचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी संबंध असल्याचे स्पष्ट केले असून, SIR नसलेल्या कालावधीत संबंधित नियमांनुसार विहित फॉर्म वापरले जातील, असेही सांगितले आहे.
लोकशाही संस्थांवरील विश्वास अबाधित ठेवण्याचे आवाहन
निवडणूक आयोग, संविधानिक संस्था आणि लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विजय-पराभवापेक्षा मोठा आहे. त्यामुळे निवडणूक निकाल आपल्या बाजूने नसल्यास संपूर्ण व्यवस्थेवरच आरोप करण्याची भूमिका स्वीकारता येणार नाही. राहुल गांधी यांनी तथ्यांच्या आधारे आपली भूमिका मांडावी आणि संविधानिक संस्थांबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रमोद कामत आणि प्रभाकर सावंत यांनी केले.











