कर्जप्रवेश, बँकिंग सुविधा आणि उद्योगांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा
जिल्ह्यातील 230 उद्योजकांचा सहभाग
स्वप्निल कदम -कुडाळ: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मुंबई प्रादेशिक कार्यालयातील वित्तीय समावेशन व विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग येथे MSME उद्योजकांसाठी टाउन हॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा, बँकिंग सुविधा तसेच पायाभूत सुविधांबाबत मार्गदर्शन करणे आणि उद्योजकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. ज्योती सक्सेना, DGM, FIDD, RBI यांनी स्वागतपर भाषण केले. श्री. पुनीत पांचोली, CGM, RBI यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. Bank of India चे DGM श्री. बलराज टंडन यांनी MSME क्षेत्रासाठी उपलब्ध कर्ज व क्षमता-वृद्धी सहाय्याची माहिती दिली.
SLBC चे DGM श्री. दीपक पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून MSME उद्योजकांना सुलभपणे कर्ज उपलब्ध होण्याबाबत मार्गदर्शन केले. DIC चे GM श्री. श्रीपाद शंकर दामले यांनी सिंधुदुर्गातील क्लस्टर आधारित उद्योगांच्या संधींवर प्रकाश टाकला. SIDBI रत्नागिरी शाखेचे प्रभारी श्री. आशीष मुंघाटे यांनी कोकणातील MSME क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.
बैठकीत Working Capital, TReDS प्लॅटफॉर्म, MSME क्लस्टर्स आणि विविध कर्ज योजनांबाबत माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम झाराप येथील आराध्य हॉटेल हॉलमध्ये पार पडला. यावेळी जिल्ह्याभरातील तब्बल 230 उद्योजकांनी उपस्थिती लावली होती. सिंधुदुर्गातील MSME उद्योजकांच्या यशोगाथाही यावेळी सादर करण्यात आल्या. त्यानंतर उद्योजक, कर्जदार, नवउद्योजक आणि MSME संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या.
खुल्या चर्चेत CGTMSE, PMEGP आणि CMEGP योजनांअंतर्गत कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी, तारणाची मागणी, कमी CIBIL स्कोअरमुळे नवउद्योजकांना येणाऱ्या अडचणी आणि तुलनेने जास्त व्याजदर यांसारखे मुद्दे मांडण्यात आले. काजू प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योगांना कार्यभांडवलाची कमतरता, नवउद्योजकांसाठी कायदेशीर बाबींवरील प्रशिक्षणाची गरज तसेच जमिनीच्या बहुमालकीमुळे तारण ठेवताना निर्माण होणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली.
उद्योगांच्या विशिष्ट वित्तीय गरजा बँकांनी समजून घेऊन क्लस्टरच्या गरजेनुसार OD व Term Loan सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच बँकिंग प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे CIBIL स्कोअरवर होणारा परिणाम कमी करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी FIDD, मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे AGM श्री. अभिनव खरे यांनी आभार मानले.











