पाळये येथे हत्ती व वन्यप्राण्यांच्या त्रासाविरोधात आंदोलकांचे उपोषण मागे ; आमदार दीपक केसरकर यांची मध्यस्थी 

दोडामार्ग : सुहास देसाई

 

पाळये दशक्रोशीतील हत्ती व अन्य वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, शेती-फळबागांचे होणारे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याविरोधात शुक्रवारी पाळये येथे उपोषण सुरू करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि हत्तीप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात वनमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला आंदोलकांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाळये दशक्रोशी हत्ती वन्यप्राणी हटाव कृती समितीच्या वतीने ‘मनुष्य वाचवा–वन्यप्राणी हटवा’ या प्रमुख मागणीसह हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यापूर्वी अनेक आंदोलने व बैठका होऊनही आश्वासनांव्यतिरिक्त ठोस काहीच घडले नसल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ नुकसानभरपाई नको, तर हत्तीप्रश्नाचा मुळातून तोडगा काढावा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

मंत्रालयात बैठक अन् तिलारीच्या मागे कंपाऊंडचा प्रस्ताव

केसरकर यांनी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे भरपाई दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तिलारीच्या मागील भागात कंपाऊंड उभारून हत्तींना तेथे ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आणि येत्या महिनाभरात यावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सिंधुदुर्गातील हत्तींची ‘वनतारा’ किंवा तत्सम संस्थेत रवानगी करण्याची मागणीही कृती समितीने केली.

 

‘गरज पडल्यास दिल्लीत जाऊन उपोषण करू’ – आंदोलकांचा इशारा

आंदोलकांनी केवळ आश्वासनांवर माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. “दोडामार्ग तालुका हा इच्छा नसताना घातलेलं मूल आहे का, की प्रत्येक वेळी प्रश्नांसाठी उपोषणच करावे लागणार?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला. हा प्रश्न केवळ नुकसानीचा नसून शेतीचे अस्तित्व आणि जीवाशी संबंधित असल्याने, गरज पडल्यास दिल्लीपर्यंत जाऊन उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वाढीव भरपाई व १००% अनुदानावर सौरकुंपणाची मागणी

कृती समितीने प्रशासनासमोर प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये

फळबागा व शेती भरपाई सह नारळ (₹३० हजार/झाड), काजू (₹२० हजार/झाड), आंबा (₹३० हजार/झाड), सुपारी (₹२० हजार/झाड), केळी (₹८००/झाड) आणि भातशेतीसाठी ₹७०० प्रति गुंठा भरपाई मिळावी तसेच

भरपाईची मुदत ठरवावी नुकसानभरपाई एका महिन्याच्या आत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी.अशी मागणी केली आहे

जीवितहानी भरपाई बाबत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला ₹५० लाख अतिरिक्त भरपाई द्यावी.

सौरकुंपण बाबत शेती व फळबागांच्या संरक्षणासाठी पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदानावर सौरकुंपण मिळावे.

सोमवारी उपवनसंरक्षकांची बैठक

आमदार केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर येत्या सोमवारी उपवनसंरक्षक दोडामार्गात येऊन अधिकारी, शेतकरी व आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. यानंतर मंत्रालयातील बैठकीत ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.

उपोषणस्थळी तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, वनक्षेत्रपाल संभाजी पाटील, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोडामार्ग तालुका विकास मंडळ (मुंबई), सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना, फळबागायतदार शेतकरी संघ अध्यक्ष विलास सावंत विविध शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले