जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते सन्मान; कुणबी समाजोन्नती संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात मानाचा पुरस्कार
खेड (प्रतिनिधी) : राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, प्रदीर्घ सेवाभाव तसेच समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत शिवसेना खेड तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिन विश्राम धाडवे यांना ‘राजकीय भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते धाडवे यांचा हा सन्मान करण्यात आला.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण) यांच्या वतीने, कुणबी युवा खेड आणि कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन तसेच समाजनेते, माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम साहेब यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सचिन धाडवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘राजकीय भूषण पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. ज्ञान, अनुभव, कार्यकुशलता आणि कौशल्याच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर धाडवे यांनी हा सन्मान समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याची नवी प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली. समाजसेवेची दखल, कार्याचा सन्मान आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा, असा या पुरस्काराचा आशय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या गौरव सोहळ्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, अमित कदम, शंकर बाईत, आग्रे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, शांताराम मसकर, रामचंद्र आईनकर, विजय जाधव, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, तसेच बाळू सनगरे, संदीप धाडवे यांच्यासह विविध पदाधिकारी, कुणबी समाजातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मानामुळे सचिन धाडवे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेतल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.













