दोडामार्ग (प्रतिनिधी):
दोडामार्ग नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांमध्येच उडालेल्या कलगीतुऱ्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे गटनेते तथा नगरसेवक नितीन मणेरीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर आणि राजेश प्रसादी यांच्यावर थेट आणि जोरदार हल्लाबोल केला. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला न येणारे हे तिघे ‘डुप्लिकेट नगरसेवक’ आहेत, असा घणाघाती आरोप करत त्यांनी नगरपंचायतीतील कथित आर्थिक व्यवहार, अनधिकृत बांधकामे, कमिशनखोरी आणि एम-सँड प्रकरणातील २५ लाखांच्या आरोपांवरून संपूर्ण कारभाराचे वाभाडे काढले.
येथील ‘स्नेह रेसिडेन्सी’ हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मणेरीकर बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व आरोपांचे पुरावे आपल्याकडे असून योग्य वेळी कायदेशीर तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना मणेरीकर म्हणाले, “भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित न राहणाऱ्या नगरसेवकांमध्ये पहिल्या क्रमांकावर माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, दुसऱ्या क्रमांकावर रामचंद्र ठाकूर आणि तिसऱ्या क्रमांकावर राजेश प्रसादी आहेत. पक्षाशी बांधील नसलेले हे तिघेही डुप्लिकेट नगरसेवक आहेत.”
बांधकामाची टेप घेऊन मी स्वतः मोजणी दाखवतो!
मणेरीकर यांनी आपल्या बांधकामावरील आरोपांना आव्हान देत सांगितले, “मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे. दोडामार्ग येथील सदनिका बांधकामात ३० मीटर अंतराच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा माझ्यावरील आरोप चुकीचा आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन टेपने मोजणी करावी, एक इंच जरी तफावत आढळली तर माझ्या बांधकामाची परवानगी नाकारावी.” नाहक त्रास देण्यासाठीच खोटे अर्ज व उपोषणाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे ते म्हणाले.
’मला नंतर भेटा’ म्हणजे नक्की काय?
बांधकाम परवानग्यांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “त्रास नको असेल तर भेटा, असे निरोप दिले जातात. नक्की कशासाठी भेटायचे? परवानगीच्या बदल्यात फ्लॅट किंवा गाळा मागण्याची ही पद्धत बंद झाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली.
एम-सँड २५ लाख प्रकरण: सिद्ध करा अन्यथा…
एम-सँड प्रकरणात नगरपंचायतीतील कोणीही २५ रुपयेसुद्धा घेतले नाहीत, असा दावा करत मणेरीकर म्हणाले, “उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी केलेला २५ लाखांचा आरोप सिद्ध करून दाखवावा. आरोप सिद्ध झाल्यास मी तत्काळ राजीनामा देईन.” तसेच, उपनगराध्यक्षांचा ‘बोलविता धनी’ दुसराच असून त्याचीही वेळ आल्यावर पोलखोल करू, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.
कमिशनखोरीवर जगणारे आणि ३०० असेसमेंटचा घोटाळा
नगरपंचायतीच्या निर्मितीच्या वेळी शेवटच्या एकाच रात्रीत तब्बल ३०० हून अधिक असेसमेंट कशा झाल्या? असा सवाल करत मणेरीकर यांनी जुन्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. “काही लोक केवळ कमिशनवर जगत असून आम्ही तळे आणि पिंपळेश्वर चौक सुशोभीकरणासारखी दर्जेदार कामे करत असल्याने ते त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा आरसा पाहावा,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.













