वाहतुकीचा ‘जीवघेणा वेग’; काही चालकांच्या बेदरकारपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यात नाटे ते रत्नागिरी मार्गावर सध्या मोठया प्रमाणावर सुरू असलेल्या बेदकार वडापकडे आरटीओ आणि पोलीस प्रशासन करत असलेल्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे वडापवाले जोमात आणि आरटीओ व पोलीस प्रशासन कोमात अशी अवस्था सध्या या भागात आहे. या मार्गावर धावणाऱ्या सुमो आणि जीप अशा तत्सम वडाप वाहतुक करणाऱ्या बेदकार वाहन चालकांचा वेग प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असून अनेक गाडया या विना कागदपत्र व अत्यंत दयनीय अवस्थेत वडाप करत आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक राहीला नाही की काय असाही सवाल जनतेतुन उपस्थित केला जात आहे.
काही चालकांच्या अतिवेगामुळे संपूर्ण मार्गावर अपघातांची भीती वाढली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाटे-पावस-रत्नागिरी हा मार्ग अनेक ठिकाणी वळणावळणांचा, अरुंद आणि चढ-उतारांचा आहे. यापूर्वीही कोकणातील अंतर्गत मार्गांवर वडाप गाड्यांचे ओव्हरलोडिंग, तीव्र वळणावर ओव्हरटेकिंग आणि अतिवेगामुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही प्रसंगांत निष्पाप प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले, तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. अशा घटना ताज्या असतानाही काही वडाप चालक पूर्वीच्या घटनांमधून कोणताही धडा घेताना दिसत नाहीत. फेऱ्या वाढवण्याच्या घाईत अवाजवी वेग गाठणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. गणेशोत्सव व अन्य प्रवाशी गर्दीच्या हंगामात तर दामदुप्पट पैसे घेऊन वडापवाले प्रवाशांची पिळवणूक करत आहेत.
काही वाहतुकदार प्रामाणिकपणे बेरोजगार असल्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करत आहेत. त्याबाबत कुणाची तक्रारही नाही. हातावर पोट असणाऱ्या प्रामाणिक चालकांच्या पोटावर पाय येऊ नये, हा त्यामागील उदात्त हेतू असतो. मात्र, या सहानुभूतीचा आणि मोकळीकीचा गैरफायदा काही बेजबाबदार चालक घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा परवाना यांना कोणी दिला असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या मार्गावर अनेक वर्षे अत्यंत संयमाने, वेगाचे भान ठेवून आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे चालकही सेवा देत आहेत. मात्रा अशा काही बेदकार चालकांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत.
महामार्गासह अन्य रस्त्यांवर नियमांवर बोट ठेऊन सामान्य वाहनचालकांकडून दंड वसुल करणारे पोलीस, आरटीओ पथकांना या बाबी दिसत नाहीत काय? की त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाटे पोलीसांनी चोरांना पकडून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याबद्दल जनता त्यांची पाठही थोपटत आहे, पण नाटे पोलीसांनी जरा हे प्रकार देखील उघडया डोळयांनी बघावेत व वेळीच आळा घालावा, अपघात झाल्यानंतर व जीवीत हानी झाल्यानंतर पंचनामे करून काहीच होणार नाही.













