नळ जोडणीला मोटर लावल्यास दंडात्मक कारवाई
सावंतवाडी । प्रतिनिधी :
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सावंतवाडी नगरपालिकेने पाण्याचे सुयोग्य आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून, नळ कनेक्शनला अनधिकृतपणे मोटर पंप लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी स्पष्ट केले की, शहरात पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून खास १० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचा वापर करून पालिकेची पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व बळकट केली जाईल. तसेच शहरात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी काटकसरीचे धोरण राबवले जाणार असून, पाणी चोरी किंवा अपव्यय करणाऱ्यांवर प्रशासनाची कडक नजर असणार आहे.
विहिरींची स्वच्छता व नैसर्गिक स्रोतांचा वापर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील सध्या वापरात नसलेल्या जुन्या विहिरींची स्वच्छता करून त्यातील पाणी वापरायोग्य बनवले जाणार आहे. याशिवाय शहरातील नैसर्गिक जलस्रोतांवर छोटे बंधारे उभारून पाणी अडवणे व जिरवणे यांवर भर दिला जात आहे. यासंदर्भात नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून त्वरित सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
मोती तलाव संवर्धन व पर्यटन विकास
पाणी नियोजनासोबतच सावंतवाडीची ओळख असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी शासकीय योजनांचा लाभ घेतला जाणार आहे. तलावातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना आखल्या जातील. याशिवाय मोती तलावात सर्व सुरक्षा अटी व नियम पाळून, मेरीटाईम बोर्डाच्या परवानाधारक संस्थेमार्फत बोटिंग प्रकल्प सुरू करून शहरात पर्यटनाला चालना देण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे.













