“पाणी वाचवणे हाच प्रमुख संदेश घेऊन उत्सव साजरा करा” – पालकमंत्री नितेश राणे

इंद्रधनु संस्थेच्या दांडिया उत्सवातून जलसंवर्धनाचा संदेश; नितेश राणे यांचा गौरव

“देवगडच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य” – पालकमंत्री नितेश राणे

देवगड : प्रतिनिधी

 

“सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ‘ट्रिगर वन’मध्ये आला असल्यामुळे यावर्षी पाणी वाचवणे हाच प्रमुख संदेश घेऊन आपण सगळ्यांनी उत्सव साजरा केला पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

 

देवगड येथे इंद्रधनु संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमात ते बोलत होते. नवरात्रोत्सवाचा उत्साह जपत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी वाचवण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रशांत वाडेकर यांनी केले.

 

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, इंद्रधनु आणि देवगड यांचे अतूट नाते आहे. या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून इंद्रधनु उत्सवाच्या निमित्ताने देवगडमध्ये उपस्थित राहण्याची एकही संधी आपण सोडलेली नाही. दरवर्षी या उत्सवामध्ये देवगडकरांचा उत्साह पाहायला मिळतो. यंदा या उत्सवाच्या माध्यमातून पाणी वाचवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत पाण्याची बचत करणे आवश्यक असून, हा संदेश प्रत्येकाने आपल्या आचरणात आणला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

इंद्रधनु संस्थेची संपूर्ण टीम दरवर्षी अतिशय उत्साहाने आणि एकजुटीने हा उत्सव साजरा करते. उत्सवाच्या एक-दोन महिने आधीपासूनच समितीची तयारी सुरू होते. त्यांच्या मेहनतीतून आणि एकजुटीतून दरवर्षी उत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. येत्या काळात हा उत्सव मागील वर्षापेक्षाही मोठा व्हावा, यासाठी आपण संस्थेच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत सदैव सोबत असल्याचे राणे यांनी सांगितले.

 

“देवगड आणि देवगडच्या जनतेला मी माझ्या कुटुंबाप्रमाणे मानतो. त्यामुळे देवगडच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी देवगडमधील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.

 

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमातून मनोरंजनासोबतच जलसंवर्धनाचा संदेश देण्याचा इंद्रधनु संस्थेचा प्रयत्न यंदा विशेष ठरला.