कोकणात दुष्काळातही संधी…

कोकणात दुष्काळातही संधी…

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर

निर्माण होणारा दुष्काळ, त्याचा परिणाम, त्याची दाहकता काय किती आहे यावर निश्चितपणे गावा-गावातून चर्चा झालीच पाहिजे. त्याचा गांभिर्यपूरक विचार व्हायलाच हवा. कोणताही विषय स्वत:च्या घरापर्यंत जेव्हा येऊ शकतो असे लक्षात आल्यावरच समाज जागा होतो. शेजारच्या घराला जर झळा लागणार असतील तर आपणाला काय करायच आहे अशीच लोकभावना रहाते. परंतु यावेळी समाज जागा होतोय. काय घडू शकेल याचा किमान अंदाज तरी घेतला जाऊ लागला आहे…

 

अखंड महाराष्ट्र दुष्काळजन्य स्थितीत आहे. त्यात नेहमी दुष्काळीस्थिती पासून बाजुला असणारा कोकण प्रांतालाही यावेळी चांगलीच झळ पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिडशे इंचापेक्षा अधिक पाऊस पडतो. परंतु दर्दैवाने या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणी साठवण करण्याचे कोणतेही नियोजन आजवर कोकणात होऊ शकले नाही. आणि कोकणवासियांच्या सुदैवाने कधी तशी परिस्थितीही निर्माण झाली नाही. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जरी ऋतुमानामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असली तरीही कोकण मात्र या सगळ्यापासून दूर राहीलेलं दिसेल त्यामुळे जी दुष्काळाची स्थिती महाराष्ट्रातील काही भागांनी जी अनुभवली आहे. तशी स्थिती कोकणाने कधी अनुभवलेली नाही. दुर्दैवाने यावेळी ती परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाईच सावट कोकणात दिसू लागलं आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात नद्या, नाले, विहीरी यांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. पाऊस, ऑक्टोबर हिट असं विचित्र वातावरण कोकणामध्ये आहे. अति उष्णतेने लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्याचवेळी मुसळधार पावसाची हजेरीही लागलेली असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कोकणातील नदी, ओहोळ, ओढे, तळी या सगळ्यामध्ये पाणीसाठा असायचा. सगळयामध्ये पाणी असल्यानेच फार कधी पाणी टंचाईच संकट निर्माण होत नव्हतं. परंतु कोकणच्या दुर्दैवाने यावर्षी दुष्काळी स्थितीचा परिणाम आतापासूनच जाणवू लागला आहे. कोकणातील कोकणवासिय निश्चितच साधव झाले आहेत. पुढे कशी, कोणती भिषणता निर्माण होऊ शकते याची चांगलीच कल्पना इथल्या जनतेला जाणीव झाली आहे. ज्यांना याची जाणीवच झाली नसेल त्यांनाही याची जाणीव निश्चितपणे होईल अशीच सध्याची स्थिती आहे.
या दुष्काळ स्थितीचा फटका कोकणात सर्वांधिक रत्नागिरी जिल्ह्यात बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये १२,८५० हेक्टर क्षेत्रावरील उभी असणारी पिक जमिनदोस्त झाली आहेत. जी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात आहे तिच स्थिती रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही उभी असणारी पिकांची स्थिती होत्याची नव्हती झाली. जी निर्माण होईल त्या परिस्थितीला सामोरे जात पुन्हा नव्या उमेदिने उभारी घेण्याचा कोकणवासियांच स्वभाव गुण वैशिष्ट्य आहे. कोकणातील शेतकरी मग तो बागायतदार असेल किंवा भात, नाचणी पिकवणारा ! शेतकरी असला तरीही नुकसानीचा गाजावाजा कधी कोणी करत नाही. शासन काय देणार आहे म्हणून वाट न पहाता पुढे जायच आहे. याच शिरस्ताने कोकणातील शेतकरी काम करत रहातो. नवीन हंगामात नुकसान भरून निघेल याच आशेवर शेतकरी काम करत रहातो. आजवर हे असेच घडत राहीले आहे. अलिकडे काही अंशी शेतकऱ्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात. एक बाब निश्चित स्वागतार्ह आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने इतरवेळी निद्रिस्त असणारा कोकणवासिय काही प्रमाणात जागा झालेला दिसतोय. जलसंधारणच्या कामांच्याबाबतीतही तो जलसंधारणाची काम झाली पाहिजेत असं वाटून पुढाकार घेताना दिसतोय. कच्चे बंधारे, पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होत आलेल्या प्रकल्पांच्या कालव्यातून पाणी सोडलं गेलं पाहिजे. काही ठिकाणी प्रस्तावित असलेले कालवे पूर्ण झाले पाहिजेत याची आता निदान चर्चा तरी होत आहे. अन्यत: ते शासन पाहिल ‘आमचा काय संबंध’ अशा भावनेतून वावर होत होता.
निर्माण होणारा दुष्काळ, त्याचा परिणाम, त्याची दाहकता काय किती आहे यावर निश्चितपणे गावा-गावातून चर्चा झालीच पाहिजे. त्याचा गांभिर्यपूरक विचार व्हायलाच हवा. कोणताही विषय स्वत:च्या घरापर्यंत जेव्हा येऊ शकतो असे लक्षात आल्यावरच समाज जागा होतो. शेजारच्या घराला जर झळा लागणार असतील तर आपणाला काय करायच आहे अशीच लोकभावना रहाते. परंतु यावेळी समाज जागा होतोय. काय घडू शकेल याचा किमान अंदाज तरी घेतला जाऊ लागला आहे. कोणत्याही संकटात निर्माण होणाऱ्या एखाद्या प्रसंगातही अनेक संधी निर्माण होतात. त्या निर्माण होणाऱ्या संधीच आपण काय करतो, कसा उपयोग करतो हीच बाब अधिक महत्वपूर्ण ठरणारी यावर्षी पाणी टंचाई भासू शकते. गंभिर परिस्थिती निर्माण होईल या एकाच विषयाने जोर धरल्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चे मिशन गावो-गावी वाडी- वस्त्यातून राबविले जात आहे. निश्चितच त्याचा चांगला सकारात्मक परिणाम आपणाला दिसून येईल. गावो-गावी किमान यानिमित्ताने पाणी साठवण्यासाठीचे प्रयत्न तरी होताहेत. ही बाब यानिमित्ताने अधिक महत्वपूर्ण आहे. भविष्यात यापेक्षाही अधिक गतीने पाण्याचा विचार कोकणात व्हायला लागेल.
निसर्गाने इतक काही दिलय त्यामुळे जीवन संघर्ष कोकणात आपसूकच कमी झाला. कमी कष्टात सहज उपलब्ध होत गेलं कि निश्चितच त्याच महत्व कधीच कुणाला नसत. आजवर डोंगर उतारावरून येणार शुभ्र झऱ्याच पाणी पिऊन लहानाचा मोठा झालेला समाजातील सामान्यजन त्यामुळे त्याच फार महत्वही उरल नव्हत. परंतु ते आता कुठे पटायला लागलय म्हणूनच वाटतय पाणी अडवायला पाहिजे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय तीच एक संधी म्हणून पाणी अडवाच मिशन अधिक तेज करत असताना पाण्याचा अपव्यय होणार नाही हे देखिल पहाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.