विर्डी येथे ‘किसान गोष्टी’ व ‘खेत बचाओ अभियान’ उत्साहात संपन्न; १४२ शेतकऱ्यांची उपस्थिती

दोडामार्ग :सुहास देसाई 

 

विर्डी येथील श्री सातेरी मंदिर परिसर येथे ‘किसान गोष्टी’ व ‘खेत बचाओ अभियान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील १४२ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच एकनाथ गवस, पोलीस पाटील श्रीम. सोनिया गवस, तालुका कृषी अधिकारी श्री. कदम साहेब, कृषी विज्ञान केंद्र (किर्लोस) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. बाळकृष्ण गावडे रत्नागिरी येथील आयपीआर कन्सल्टंट श्रीम. समीक्षा दाभाडे मंडळ कृषी अधिकारी घाडगे ‘आत्मा’चे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. पाटील , उप कृषी अधिकारी श्री. कोळी ग्रामसेवक श्री. जाधव आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सोनवणे उपस्थित होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली

बदलते हवामान व सेंद्रिय शेतीयाबाबत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. बाळकृष्ण गावडे यांनी बदलत्या हवामानामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच काजू पिकाच्या मोहोर संरक्षणासाठी फवारणीचे वेळापत्रक यावर सखोल मार्गदर्शन केले.

डिजिटल कृषी सेवा विषयी तालुका कृषी अधिकारी श्री. कदम यांनी ‘महाकृषी AI ॲप’ आणि ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) चे महत्त्व स्पष्ट करत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.

लाल भात संशोधन याबाबत रत्नागिरीच्या आयपीआर कन्सल्टंट श्रीम. समीक्षा दाभाडे यांनी लाल भातावरील संशोधन आणि त्याचे आरोग्यदायी व आर्थिक महत्त्व विशद केले.

सरकारी योजना व प्रक्रिया उद्योग: मंडळ कृषी अधिकारी श्री. घाडगे यांनी PMFME योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग (Processing Unit) स्थापन करण्याबाबत व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

आत्मा व पीक विमा याबाबत ‘आत्मा’चे श्री. पाटील यांनी आत्मांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी पीक विमा काढण्याचे आवाहन करत त्याबाबत मार्गदर्शन केले.

महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देवून गौरविण्यात आले.

एकूण १४२ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक व यशस्वीरीत्या पार पडला.