नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या शुभमचे विशेष अभिनंदन
चिपळूण (प्रतिनिधी) : पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले. या सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या चिपळूण तालुक्याच्या शुभम शिंदे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत देशासाठी सुवर्णपदक मिळविण्यात योगदान देणाऱ्या शुभमच्या कामगिरीमुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेतील यशानंतर चिपळूणमध्ये परतलेल्या शुभम शिंदे याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष तथा रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुभमची विशेष भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कबड्डी क्षेत्राशी जवळून संबंध असलेले नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुभमच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. चिपळूणच्या मातीतून घडलेल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि देशाच्या सुवर्णपदक विजयात योगदान देणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना उमेश सकपाळ म्हणाले की, शुभम शिंदे याने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले. पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या सुवर्णयशात महत्त्वाचे योगदान दिले. त्याचे हे यश चिपळूणमधील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची क्षमता असल्याचे या यशाने दाखवून दिले आहे.
शुभमच्या स्वागत व अभिनंदनप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक अरुण भोजने, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेविका राणी महाडिक व नीलम जाधव, नगरसेवक गणेश आग्रे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, करामत मिठागरी, सुधाकर सकपाळ, संदेश गोरिवले, फैसल मेमन, भाऊ भाटकर, जॉन महाडिक, बाबू गोलांबडे, नरेश सोळंकी आणि वसीम चिपळूणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून देशाच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी संघात चिपळूणच्या शुभम शिंदेचा समावेश असणे ही स्थानिक क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तालुक्यातील कबड्डीपटूंना नवी प्रेरणा मिळणार असून, आगामी काळातही त्याने भारतीय संघाकडून अशीच दमदार कामगिरी करत देशाचा आणि चिपळूणचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दिल्या.













