पिंगुळी तलावाच्या प्रश्नावर साईल-नारकरांचा वैभव नाईकांवर घणाघात
पाझर तलाव, व शहर विकास व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम. निलेश राणे नेहमीच सक्रिय
सिंधुनगरी : प्रतिनिधी
दहा वर्षे आमदारपद आणि सत्तेची संधी मिळूनही पिंगुळी पाझर तलावाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका न घेणारे माजी आमदार वैभव नाईक आज अचानक पिंगुळी जनतेचे कैवारी बनून उपोषणाला बसले आहेत. सत्तेत असताना या प्रश्नाकडे दुर्लक्ष का केले? आमदार निलेश राणे यांनी दोन वेळा बैठका बोलावून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विरोधकांना चर्चेची संधी दिली, तेव्हा बैठकीला उपस्थित राहण्याचे सौजन्यही दाखविले नाही. उलट आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी पाझर तलावाचे पाणी संवर्धन व त्या तलावाकडे जाणारा मार्ग खुला करून नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी नको म्हणून जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला त्यांनी आदेश दिले! याबाबतची खरी वस्तुस्थिती उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल आणि कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक उर्फ केशव नारकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली!
विकासकामांना विरोध करायचा, आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय प्रसिद्धी मिळवायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हाच विरोधकांचा खरा अजेंडा असल्याचा आरोप दादा साईल यांनी या पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दालनात मंगळवारी (ता. ३) आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत साईल आणि नारकर यांनी पिंगुळी पाझर तलावाच्या प्रश्नावरून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनींच्या प्रश्नावरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
साईल आणि नारकर म्हणाले, पिंगुळी येथील पाझर तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी यापूर्वीच दोन वेळा बैठका घेतल्या आहेत. तलावातील गाळ काढणे, सौंदर्यीकरण, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि पाणीसाठा टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्या विकासका बरोबरही त्यांनी चर्चा केली आहे. तलावावर ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणे ही प्राथमिकता आहे. त्याचबरोबर तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबतही चर्चा झाली आहे.
विशेष म्हणजे या बैठकांना विरोधकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी चर्चेसाठी उपस्थित राहण्याची तयारी न दाखविणारे आता उपोषणाचे हत्यार उपसत आहेत. प्रश्न सोडविण्याची खरी इच्छा असती, तर बैठकीत आपली भूमिका मांडली असती. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला असता. मात्र, चर्चेत सहभागी न होता आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे म्हणजे प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकीय प्रसिद्धीला प्राधान्य देण्यासारखे आहे. उपोषणापूर्वी प्रशासनाशी नेमकी काय चर्चा केली, कोणते प्रश्न मांडले आणि त्यावर काय निर्णय झाला, याची माहिती नाईक यांनी जनतेसमोर द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले.
तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावरही आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. संबंधित रस्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात जाणारा असून, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडवू नये, अशा सूचना संबंधित विकासकाला देण्यात आल्या आहेत. तलावाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हित आणि परिसराचा विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना वस्तुस्थिती समजून न घेता आंदोलन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
जमिनी लुटल्याचा आरोप म्हणजे जनतेची दिशाभूल!
पिंगुळी परिसरातील जमिनी परप्रांतीयांनी लुटल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक करीत आहेत. मात्र, हा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे केशव नारकर यांनी स्पष्ट केले. स्थानिक जमीनमालकांनी स्वतःच्या जमिनी खरेदीदारांना किंवा विकासकांना विकल्या आहेत. कोणाचीही जमीन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आलेली नाही. कायदेशीर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना परप्रांतीयांनी जमिनी लुटल्याचे स्वरूप देऊन जनतेमध्ये गैरसमज पसरविणे चुकीचे आहे.
वैभव नाईक दहा वर्षे या भागाचे आमदार होते. त्यातील काही काळ ते सत्तेतही होते. त्या काळात त्यांना या जमिनींचे व्यवहार चुकीचे वाटले नाहीत का? परप्रांतीयांकडून अन्याय होत असल्याचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नव्हते का? सत्तेत असताना गप्प राहायचे आणि सत्ता गेल्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करायचे, ही भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका नारकर यांनी केली.
विकासकामे सुरू असताना आंदोलनाचे राजकारण!
पिंगुळी परिसर औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. गेल्या दोन वर्षांत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विद्युत रोहित्रे, पाणीपुरवठा, रस्ते आणि उद्योगांसाठी आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. या भागात मालवाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. पिंगुळीतील विद्युत कार्यालयाकडून पुढे जाणाऱ्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. महामार्गावरील वडगणेश परिसरापासून पिंगुळी म्हापसेकर तिठा आणि गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठीही आमदारांनी प्रयत्न केले आहेत.
एकीकडे विकासाची कामे मार्गी लागत असताना दुसरीकडे प्रत्येक कामात राजकारण आणून विरोध करण्याची भूमिका घेतली जात आहे. वैभव नाईक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर साटेलोट्याचे आरोप केले आहेत. मात्र, दहा वर्षे आमदार असताना याच प्रशासनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न का सोडविले नाहीत? आपल्या कार्यकाळातील अपयश झाकण्यासाठी आज अधिकाऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले. त्यामुळे आता कोणताही मुद्दा उपस्थित करून आंदोलन करायचे आणि राजकीय अस्तित्व टिकवायचे, असा त्यांचा प्रयत्न दिसत असल्याची टीका साईल आणि नारकर यांनी केली.













