राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना करावा लागतोय मोठा वळसा
सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग सचिवांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील पाग बौद्धवाडीसमोरून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, या कामामुळे बौद्धवाडी तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाग बौद्धवाडीजवळ उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाची उभारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई येथे राष्ट्रीय महामार्गाचे सचिव श्री. संतोषजी शेलार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना पाग बौद्धवाडी आणि लगतच्या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या मार्गाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या कामामुळे पूर्वीच्या मार्गाने सहजपणे ये-जा करणे अडचणीचे झाले असून, नागरिकांना पर्यायी मार्गाने मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान मुले तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दैनंदिन गरजांसाठी ये-जा करताना वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी त्याच्या उभारणीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या मूलभूत वाहतूक सुविधांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पाग बौद्धवाडी आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना महामार्ग ओलांडताना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध होईल, तसेच भविष्यातील वाहतूकविषयक अडचणीही दूर होतील, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार यांनी हे निवेदन तातडीने संबंधित खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील कार्यालयात पाठविण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजु जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, डॉ. अशोक सकपाळ, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे अध्यक्ष प्रभाकरजी सकपाळ आणि सरचिटणीस सिद्धार्थ परशुराम जाधव उपस्थित होते. पाग बौद्धवाडी व परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता संबंधित विभागाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी आणि उड्डाणपूल अथवा भुयारी मार्गाच्या उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महामार्गाचा विकास होत असताना स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मूलभूत सुविधांनाही प्राधान्य मिळावे, हीच या निवेदनामागील प्रमुख भूमिका आहे.













