दोडामार्ग:प्रतिनिधी
दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सीजवळ भेडशी रोडवर आज सकाळी दुचाकी आणि टाटा मॅजिक गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार असलेले दोन चुलत भाऊ जागीच ठार झाले असून, टाटा मॅजिकचा चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, टाटा मॅजिक गाडी भेडशीहून दोडामार्गाकडे येत होती. यादरम्यान रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी आणि टाटा मॅजिकची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार दोन्ही चुलत भावांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले.
हे दोन्ही चुलत भाऊ पेंटिंगच्या (रंगकाम) कामासाठी जात होते आणि एकत्रच काम करत होते. मृतकांमध्ये राजकुमार झाटव (वय २५, अविवाहित) आणि अर्जुन झाटव (वय ३०, विवाहित – त्यांना पत्नी व चार मुले आहेत) अशी त्यांची नावे आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील अरवल गावचे रहिवासी असून, सध्या दोडामार्ग येथे एका कंत्राटदाराकडे राहत होते. अपघातात टाटा मॅजिकचा चालकही जखमी झाला आहे.
सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.














