चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबईतील नामांकित आणि तब्बल ७८ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या आयुर्वेद प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी डॉ. संतोष दाभोळकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूणच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आयुर्विद्या प्रसारक मंडळ -सायन, मुंबई ही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. सन १९५२ मध्ये स्थापन झालेले या संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय,शिव,हे मुंबईतील एक नामांकित वैद्यकीय शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ- नाशिक या ख्यातकीर्त विद्यापीठाशी हे कॉलेज संलग्न आहे. युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग असलेले हे मुंबई स्थित मेडिकल कॉलेज आहे. या संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेद शिक्षण आणि वैद्यकीय सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे. मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाजवळ सहा एकरांच्या विस्तीर्ण परिसरात संस्थेचा प्रशस्त आणि सुसज्ज कॅम्पस उभारण्यात आला आहे. येथे सुसज्ज आयुर्वेदिक रुग्णालय असून पदवी (बी.ए.एम.एस.) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण दिले जाते. गेल्या ७४ वर्षांपासून ही संस्था कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर घडविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. आयुर्वेदिक वनस्पतींची समृद्धता आणि निसर्गरम्य परिसर हेही या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. डॉ. दाभोळकर यांनी याच संस्थेतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. अशा या अत्यंत प्रतिष्ठित आणि गौरवांकित संस्थेच्या विश्वस्तपदी डॉ. संतोष दाभोळकर यांची निवड होणे ही त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान मानला जात आहे.
डॉ. दाभोळकर हे चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथे रुग्णसेवा करत आहेत. गत ४० वर्षवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘निमा’ या डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे १५ वर्ष सांभाळली. बी. ए. एम. एस. ग्रॅज्युएट असोसिएशनचे ते संस्थापकीय सदस्य आहेत. तसेच चिपळूण वैद्य मंडळ, चिपळूण डॉक्टर असोसिएशन, चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन अशा संस्था संघटनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागात त्यांनी केलेले काम हे लक्षवेधी ठरले आहे. विविध सामाजिक व वैद्यकीय संस्थांमध्ये जबाबदारीची पदे भूषविणारे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणाऱ्या डॉ. संतोष दाभोळकर यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा संस्थेच्या पुढील वाटचालीस निश्चितच लाभ होणार आहे. विशेष म्हणजे, डॉ. संतोष दाभोळकर यांची दोन्ही मुलेही वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यांची कन्या डॉ. सायली दाभोळकर या एम.डी.एस. (प्रोस्थोडोन्टिस्ट) असून मुंबई येथे वैद्यकीय सेवा करीत आहेत. तर त्यांचे पुत्र डॉ. साहिल दाभोळकर हे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नेरूळ येथे एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. एकाच कुटुंबातील दुसऱ्या पिढीनेही वैद्यकीय क्षेत्राची वाट निवडत आरोग्यसेवेचा वारसा पुढे चालविणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. डॉ. संतोष दाभोळकर यांच्या या गौरवास्पद निवडीबद्दल चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय-उद्योजकीय आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.













