दापोलीत नारळ काढताना विजेचा धक्का बसून पोलीस पाटलाचा मृत्यू

दापोली : नारळाच्या झाडावरून नारळ काढत असताना हातातील लोखंडी पानकापा महावितरणच्या मुख्य विद्युतवाहक तारेला लागल्याने विजेचा जोरदार धक्का बसून एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दापोली तालुक्यातील उंबर्ले गाववाडी येथे घडली. संतोष बाळ नाचरे (वय ५०, व्यवसाय- पोलीस पाटील, रा. उंबर्ले गाववाडी, ता. दापोली) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नाचरे हे घराशेजारील नारळाच्या झाडाला लावलेल्या लोखंडी शिडीवर चढून लोखंडी पानकाप्याच्या साहाय्याने नारळ काढत होते. यावेळी त्यांचे वडील व खबर देणारे बाळू गोविंद नाचरे हे शिडी हाताने धरून उभे होते. नारळ काढत असताना संतोष यांचा तोल गेला आणि त्यांच्या हातातील लोखंडी पानकापा झाडाजवळून जाणाऱ्या महावितरणच्या खांबावरील मुख्य विद्युतवाहक तारेला स्पर्श झाला.
यामुळे संतोष यांना विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. वडिलांनी आरडाओरड केल्यानंतर गावातील अजय सणस, प्रतीक जाधव आणि इतर ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी संतोष यांना हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रिक्षाने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना सायंकाळी ६ वाजता मयत घोषित केले.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ९२/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.