जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाचा २९ नोव्हेंबरला खेडमध्ये जिल्हास्तरीय मेळावा

 संत शिरोमणी गुरु रवीदास विश्व महापीठाचे राष्ट्रीय महामंत्री नामदेव कदम यांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने समाजाची एकजूट अधिक बळकट करणे, संघटनात्मक विस्तार साधणे आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी खेड येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील द. ग. तटकरे सभागृहात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार असून, संत शिरोमणी गुरु रवीदास विश्व महापीठ, दिल्लीचे राष्ट्रीय महामंत्री नामदेव कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
जिल्हा संघाचे अध्यक्ष सुरेश खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी संत शिरोमणी गुरु रवीदास विश्व महापीठाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरविंद माने, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वप्नील मोरे यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, विभागप्रमुख आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात रोहिदास समाजाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेण्याबरोबरच समाजाची एकजूट, संघटनात्मक मजबुती, सामाजिक प्रबोधन आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समाजबांधवांना एकत्र आणून समाजाच्या प्रगतीसाठी सामूहिक दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे उपाध्यक्ष अजित आंबवकर, कार्याध्यक्ष विजय खेडेकर, सचिव गणेश सरणकर, सहसचिव दीपक मेढेकर, संतोष पालशेतकर आदी पदाधिकारी विशेष प्रयत्न करीत आहेत. या जिल्हास्तरीय मेळाव्यास खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील रोहिदास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर यांनी केले आहे.