डीबीजे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात संविधान दिन व हुतात्मा दिन साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : डीबीजे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन तसेच २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावनेचे) सामूहिक वाचन केले.
यावेळी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि लोकशाहीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. पी. मोरे यांनी केले होते. संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिक व शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, डॉ. बी. एस. कांबळे, डॉ. राहुल पवार, डॉ. डी. टी. कदम यांच्यासह अन्य प्राध्यापकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण अशा दुहेरी उद्देशाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व गांभीर्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.