संध्याकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत मोबाईल/टिव्ही बंद
आबलोली(अमोल पवार)जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं.१ केंद्र शीर,ता.गुहागर शाळेचा प्रथम सत्रातील पालक मेळावा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मसूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शालेय कार्यक्षेत्रातील वाडी प्रमुख , शालेय सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महीला,ग्रामस्थ, पालक,शिक्षक यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास व्हावा तसेच शाळेत शिक्षकांनी दिलेला स्वाध्याय पूर्ण करताना वाचन, मनन, चिंतन,पाठांतर याकडे दुर्लक्ष होऊ नये. विद्यार्थी अध्ययनाच्या प्रवाहात टिकून रहावा, हुशार मुलांसोबत अभ्यासात मागे असणारा विद्यार्थीही प्रगत व्हावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र कुळये यांनी विद्यार्थ्यांचे पाडलेले अभ्यास गट सांगून उपक्रमांसंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर मेळाव्यात चर्चा होऊन संध्याकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत नेमून दिलेले विद्यार्थी नेमून दिलेल्या घरामध्ये अभ्यासाला बसतील. सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी ६ .०० ते ८.०० दोन तास तर गटप्रमुख उपस्थितीचा आढावा घेऊन फक्त ६.३० ते ७.३० या वेळेत वाचन व पुढील वेळेत लेखन करण्याची सूचना देईल. प्रत्येक अभ्यासगटाला स्वतंत्र उपस्थिती पत्रक व स्वतंत्र नाव देण्यात येईल.या दरम्यान मोबाईल व टिव्ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सदर अभ्यासवर्गाला भेट देतील.शिक्षकही आठवड्यातून एकदा कोणत्याही अभ्यास गटाला भेट देतील.दिलेल्या गटात सर्व विद्यार्थी नियमांचे पालन करतात की नाही याचा आढावा परिपाठात घेतील व पालकांना तशी समज देतील.चांगला अभ्यास करणाऱ्या व एकही तक्रार नसणाऱ्या गटांचे शाळा व्यवस्थापन समिती सभेच्या वेळी अभिनंदन केले जाईल.
सदर नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक वाकडे, उजळे,व बलशेटवार यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सर्वानुमते पालक मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.
सदर नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे पालक मेळाव्यात सर्वानुमते ठरविण्यात आले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.











