
राजापूर येथे जागतीक छायाचित्रणदिनानिमित्त आयोजन
राजापूर (वार्ताहर):आज सर्वच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केलेली आहे. छायाचित्रकारांनी समाज जीवनामध्ये होत असलेल्या बदलांचा मागोवा घेताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या क्षेत्रामध्ये चांगले काम करून जनतेला सेवा दयावी असे आवाहन सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य व शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांनी येथे केले.
जागतीक ‘छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने शनिवारी राजापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छायाचित्रकारांच्या ‘फोटो फेअर’ स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन श्री. सामंत व माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, फोटोग्राफी हा माझा लहानपणापासूनचा आवडता छंद होता. परंतु जस जसा व्याप वाढत गेला तस तसा हा माझा छंद मागे पडत गेला. फोटोग्राफी नेहमी आयुष्यामध्ये करावी लागते. कुठलाही कार्यक्रम असो समारंभ असो त्यामध्ये फोटोग्राफी हा विषय येतो. सुरूवातीच्या काळात पासपोर्ट फोटोसाठीही दोन दिवस वाट पाहावी लागत असे. मात्र आज टेक्नॉलॉजी बदलली आता दहा मिनिटांत फोटो मिळू लागले. सुभाष फोटो सारखी आधुनिक लॅब रत्नागिरीत उभी राहिली. जसं जसा काळ बदलत गेला तस तसा फोटोग्राफी क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. मात्र मोबाईल आला त्यावेळी या क्षेत्रावर अडचणीची वेळ आली. मात्र फोटोग्राफरनी वेगवेगळया कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधत त्यावर उपाय शोधला. प्रत्येक इव्हेंटला त्यानी वेगळे स्वरूप दिले. आणि त्यावर मात केली अशी शब्दात किरण सामंत यांनी छायाचित्रकारांचे कौतुक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या माजी आमदार ऍड.हुस्नबानू खलिफे, निवासी नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडित, राजापूर अर्बन बँक चेअरमन सौ. अनामिका जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, राजापूरचे माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलीफे, अॅड. राकेश भाटकर, राजापूर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल उपस्थीत होते.
यावेळी अॅड. सौ. खलिफे, तसेच नायब तहसिलदार सौ. पंडीत, अॅड. राकेश भाटकर यांनी मनोगत व्यक्त करताना छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. तर सर्वोत्कृष्ठ संघटना म्हणून जिल्हा असोसिएशनच्या वतीने राजापूर तालुका फोटोग्राफर व व्हीडीओग्रारफ असोसिएशनचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या छायाचित्रकारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला फोटोग्राफीच्या अनुषंगाने कॅमेरे, लेन्सेस, जुन्या काळातील कॅमेरे, फोटो अल्बम आदी विविध वस्तूंचे प्रदर्शन देखील ठेवण्यात आले होते.याप्रसंगी उपाध्यक्ष सुहास कोंडेकर, सचिव संदेश टिळेकर, खजिनदार चंद्रशेखर माणिक, रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे संजय शिंदे, कांचन मालगुंडकर, गुरु चौगुले, प्रवीण पाटोळे, सुरेंद्र गीते, विनय गोंधळेकर, श्वेता बेंद्रे, संतोष आग्रे, राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशनचे चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, प्रदीप कोळेकर, प्रितेश देवळेकर, महेश पांचाळ, लियाकत सारंग, स्वप्नील पवार, अक्षय सोगम, महेश चव्हाण, पद्माकर आरेकर, अभिजीत पाटील, जयदीप मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया संख्येने छायाचित्रकार उपस्थीत होते.











