
नव्या वर्षात मोबाईल अप, युपिआय मर्चंट सेवा देणार
राजापूर (वार्ताहर): सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरीब जनतेची पतपेढी अशी ओळख असलेल्या येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. पतसंस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी बजावताना संस्थेने २ कोटी ६५ लाख इतका ढोबळ नफा मिळवताना १ कोटी ५८ लाख इतका निव्वळ नफा प्राप्त केला आहे. तर १५० कोटींच्या एकत्रिक व्यवसायाकडे वाटचाल करताना पतसंस्थेने या आर्थिक वर्षात १३२ कोटी ५५ लाखाचा एकत्रित व्यवसाय केला असून मागील वर्षाअखेरील एकत्रीत व्यवसायात १४ टक्के इतकी वाढ करत पतसंस्थेने आपल्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे.
३१ मार्च रोजी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची अखेर झाली आहे. त्यानंतर या आर्थिक वर्षात पतसंस्थेची एकुणच वाटचाल आणि मिळविलेले मान सन्मान व नियोजित ध्येय धोरणांबाबत राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
याप्रसंगी अध्यक्ष मांडवकर यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. पतसंस्थेने सुयोग्य असे नियोजन करून यावर्षीही कर्ज वितरण, कर्जवसुली, ठेवी अशा सर्वच स्तरावर प्रगती साधल्याची माहिती श्री. मांडवकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, संचालक अविनाश नवाळे, सोनू तिर्लोटकर, अनंत मोरवसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर आदी उपस्थित होते.
संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८६६ ने सभासद वाढ होऊन एकूण सभासद संख्या १४ हजार ४३८ इतकी झाली. सदरची सभासद वाढ १३ टक्के इतकी आहे. वसूल भागभांडवलामध्ये १४ टक्के ने वाढ होऊन एकूण वसूल भागभांडवल ४ कोटी ११ लाख इतके झाले आहे. निधी मध्ये ३० टक्केनी घसघशीत वाढ होऊन एकूण निधी रु. ७ कोटी ९ लाख इतका झाला आहे. गुंतवणूका मध्ये यावर्षात घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये ७८ टक्केनी वाढ होवून एकूण गुंतवणुका रु. ४६ कोटी ४९ लाख इतक्या झाल्या आहेत. ठेवी मध्ये १६ टक्केनी वाढ होऊन मार्च २५ अखेर एकूण ठेवी रक्कम रु. ७७ कोटी ९५ लाख इतक्या झाल्या आहेत. कर्जा मध्ये १० टक्के वाढ होऊन एकूण कर्ज हि रु. ५४ कोटी २७ लाख इतकी आहेत.
मार्च २५ अखेर खेळत्या भागभांडवलात ३३ टक्के वाढ होऊन एकूण खेळते भागभांडवल रु.१०५ कोटी ५५ लाख इतके झाले आहे. एकत्रित व्यवसाय ११६ कोटी ४४ लाखावरून मार्च २५ अखेर एकूण एकत्रित व्यवसाय १३२ कोटी २२ लाख इतका झाला आहे. सदरची वाढ हि १४ टक्के इतकी आहे.
पतसंस्थेला यावर्षी ढोबळ नफा २ कोटी ६५ लाख इतका झाला आहे. त्यामधुन आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी ५८ लाख इतका झाला आहे. यावर्षीही वसुलीचे प्रमाण ९९ टक्के इतके राखत सीआरएआर १५ टक्के, ढोबळ एनपीए १.४८ टक्के तर एनपीए शुन्य टक्केची ची परंपरा कायम राखली असल्याचे मांडवकर यांनी नमुद केले.
तर चालू आर्थिक वर्षात ३ शाखांनी कर्ज वसुलीचे प्रमाण १०० टक्के राखले आहे. तर अन्य ५ शाखांनी ९९ टक्के इतके कर्जवसुलीचे प्रमाण राखले आहे. संस्थेने सभासद हिताला प्राधान्य देताना आरटीजीएस, एनईएफटी, एमएमएस अलर्ट, मिनी एटिएम, कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर नव्या वर्षात क्युआर कोड, मोबाईल बँकिंग अप, मोबाईल अपद्वारे पिग्मी कलेक्शन, मिस्ड कॉल् सर्व्हीस, आयएमपीएस, युपिआय मर्चंट, पॅन व आधार व्हेरीफीकेशन खाते उघडणे आदी अत्याधुनिक सेवा सभासदांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे श्री. मांडवकर यांनी सांगितले.
तर २०२४-२५ या आर्थिक वर्षातील कामकाजाची दखल घेत सलग सातव्या वर्षी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बँको तसेच कोकण पतसंस्था फेडरेशनचा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेश यांचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार पतसंस्थेला प्राप्त झाल्याची माहिती श्री. मांडवकर यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, स्थानिक कमिटी, व्हा. चेअरमन प्रकाश लोळगे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, माजी संचालक, सीए निलेश पाटणकर, अॅड. एस. एम. देसाई, शाखाधिकारी, कर्मचारी, पिग्मी व आरडी एजंट या सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचे मांडवकर यांनी नमुद केले. बँकेच्या प्रगतीचे हे यश सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी नमुद केले. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी प्रास्ताविक केले.