आचरा-कोल्हापूर, आचरा-बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मालवण आगार व्यवस्थापक यांना निवेदन

मालवण | प्रतिनिधी : कणकवली बस डेपोची काही वर्षांपूर्वी सुरू असलेली आचरा-बोरिवली तसेच आचरा-कोल्हापूर बसफेरी बंद करण्यात आली आहे. प्रवासी वर्गाचा विचार करता पुन्हा दोन्ही बसफेऱ्या सुरु कराव्यात. या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना देण्यात आले.

दरम्यान मालवण आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत तसेच ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याची सविस्तर माहिती द्यावी. आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यात येतील असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

तालुक्यातील आचरा येथून कणकवली डेपोची आचरा – बोरिवली बसफेरी काही वर्षापूर्वी सुरू होती. ती बंद केल्याने प्रवाशांना मुंबई कडे जाताना अन्य गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात खासगी गाड्यांमधून प्रवास करणे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे आचरा – बोरिवली बसफेरी सुरू झाल्यास आचरा, चिंदर, त्रिंबक, पळसंब या ठिकाणच्या प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर आचरा – कोल्हापूर ही बसफेरीही सुरू करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मनोज हडकर, जयप्रकाश परुळेकर, अजित घाडी, पंकज आचरेकर यांसह अन्य उपस्थित होते.