मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात रविवारी एक भीषण दुर्घटना घडली. प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने मोठा अनर्थ झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रविवार असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. अनेक पर्यटक पूलावर उभे होते, त्याच वेळी अचानक पूल कोसळल्याने अनेक जण थेट नदीत पडले.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इंद्रायणी नदीला दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जोरदार पूर आला आहे. त्यामुळे बचावकार्य अधिक कठीण झाले असून, प्रशासन रेड अलर्टवर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेची माहिती घेतली असून, प्रशासनास तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.













