खेड | प्रतिनिधी :
तालुक्यातील खारी जाधववाडी येथे मादी अजगर व तिच्या १२ पिलांना वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांकडून सुखरूपपणे सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने तसेच श्री छत्रपती वाईल्ड लाइफ फाउंडेशन व वन विभाग यांच्या प्रयत्नाने सुरक्षित मुक्त अधिवासात करण्यात आली.
मानवी वस्ती जवळ आढळलेली मादी सुरक्षित रहावी व तिच्या पिलांचा सुरक्षित जन्म होऊन ते त्यांच्या आदिवासात मुक्त होण्यासाठी केलेल्या या सुयुक्त प्रयत्नांचे वन्यजीव प्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे.
खेड तालुक्यातील खारी जाधववाडी येथे अजगर असल्याची माहिती २४ जून रोजी प्रियेश लांबाडे यांनी वन्यजीव बचाव पथक श्री छत्रपती वाईल्ड लाइफ फाउंडेशन व वन विभाग यांना दिली होती. हे अजगर पकडण्यासाठी वन अधिकारी सुरेश उपरे व श्री छत्रपती वाईल्ड लाइफ फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी संयुक्तरित्या समक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणीकेली. दरम्यान या ठिकाणी एक मादी अजगर आढळून आली. हे अजगर लोक वस्तीत आल्याने त्याला सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. परंतु अजगर हा मादी जातीचा असल्याने व स्थानिक लोकांना त्याच ठिकाणी वारंवारदिसत असल्याने सदर जागेची पाहणी केली. यावेळी संबंधित परिसरात अजगराची १२ अंडी मिळून आली.
अजगराची ही अंडी लोकवस्ती जवळ असल्याने व अंड्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या अंड्या जवळील तापमान थर्मामीटरच्या सहाय्याने तपासण्यात आले. तसेच सदर ठिकाणी असलेली अजगराची १२ अंडी जागेवरील मातीसहकाळजीपूर्वक सुरक्षित ताब्यात घेण्यात आली. सदर अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यासाठी ५५ ते ६० दिवसांचा कालावधी आवश्यक असतो, परंतु सदरची अंडी परिपक्व झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ही अंडी २४ तास तज्ञांच्या निगराणी खाली ठेऊन अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी आवश्यक असलेले तापमान
राखून ठेवण्यात आले. या अंड्यांतून ५ ते ७ जुलै या कालावधीत अजगराची १२ पिल्ले सुरक्षितरित्या बाहेर आली. ही पिल्ले नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमात विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल खेड सुरेश उपरे, वनरक्षक राणबा बंबर्गेकर, अशोक ढाकणे, परमेश्वर डोईफोडे, प्रियंका कदम तसेच श्री. छत्रपती वाईल्ड लाइफ फाऊंडेशनचे आशुतोष सूर्यवंशी, सर्वेश पवार, रोहन खेडेकर, सुमित म्हाप्रळकर, श्वेत चौगुले, सुरजजाधव, वरुण खांबे यांनी सहभाग घेतला. खारी ग्रामस्थ व वन्य जीव प्रेमी यांच्या मदतीने ही संयुक्त कामगिरी यशस्वी रित्या पार पाडण्यात आली.