खेड (प्रतिनिधी) :– लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऐनवरे गावात सामाजिक उपक्रमातून एक प्रशंसनीय उपक्रम राबवण्यात आला. ऐनवरे गावचे माजी सरपंच तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले श्री. संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत ऐनवरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि शाळेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.

या कार्यक्रमास लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष सुरेश चिकणे सर, रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, संदीप मोरे, विवेक कदम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शिक्षक वर्ग उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा केली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत प्रत्येक वाढदिवस समाजकारणाच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आला. या कार्यक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली तसेच समाजात शैक्षणिक संवेदनशीलतेचा संदेश दिला गेला.











