राजापूर (प्रतिनिधी): ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आपण सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करत आलो आहोत. माझ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आपण धोपेश्वर पंचायत समिती गणातुन महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूकीच्या मैदानात उतरलो असल्याचे महायुतीचे धोपेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार अभिजित गुरव यांनी सांगितले.
महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासाठी एकदिलाने काम करत असुन आपला विजय निश्चित असल्याचे गुरव यांनी सांगितले.
भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अभिजित गुरव हे एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात, भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी तालुक्यात चांगली कामगिरी केली आहे. तर सध्या ते भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपल्या या पदाच्या माध्यमातुन त्यांनी भाजपा संघटना बांधणीसाठी महत्वाचे योगदान दिले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा एक धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला वा जनतेच्या प्रश्नाला जर प्रशासकिय पातळीवर न्याय वा मदत मिळण्यास उशीर झाला तर स्वता वैयक्तीक रित्या त्या माणसाला मदत करून हातभार लावण्याचे काम गुरव यांनी केले आहे. त्यामुळे आपला हक्काचा माणूस अशी त्यांची धोपेश्वर गणातच नव्हे तर तालुक्यात ओळख आहे.
कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तर पक्षाच्या माध्यमातुन ग्रामीण भागात अनेक विकास कामांना निधी उपलब्ध करून देताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत. त्यामुळे अभिजित गुरव यांच्याकडे काम म्हणजे १०० टक्के होणारच असा जनतेमध्ये विश्वास आहे.
ग्रामीण भागातील विकासासाठी आपण या निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे नमुद करत भविष्यात धोपेश्वर पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी नमुद केले. आजही या भागात रस्ते, विज, पाणी, स्वच्छता यांसाख्या समस्या आहेत, त्या आपण सोडवूच पण भविष्यात या गणाच्या विकासाचा एक आराखडा तयार करून या गणाचा सर्वांगिण विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे गुरव यांनी सांगितले.










