आंबोलीत २३ मे पासून पतसंस्थांचे जिल्हास्तरीय पहिले भव्य अधिवेशन

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित सावंतवाडीच्या वतीने येत्या २३ आणि २४ मे रोजी आंबोली येथे जिल्ह्यातील पतसंस्थांचे पहिले भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अधिवेशनाची जय्यत तयारी सध्या जोरदार सुरू असून, त्यानिमित्त सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील पतसंस्थांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये एकोपा वाढवणे, कामकाजात एकसूत्रीपणा आणणे, सर्व संस्थांनी एकमेकांना सहाय्यभूत राहून काम करणे आणि भविष्यातील स्पर्धात्मक आव्हानांना अधिक प्रखरपणे तोंड देता यावे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पतसंस्थांचे हे पहिलेच अधिवेशन होत असून या अधिवेशनामध्ये सर्व पतसंस्था उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवत आहेत. पतसंस्थांचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अनेक संस्थांनी आर्थिक स्वरूपात विविध पातळ्यांवर हातभार लावण्याचे काम सुरू केले आहे, त्याबद्दल अध्यक्ष श्री. राऊळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या अधिवेशनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे काम करणाऱ्या अनेक पतसंस्थांना गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रतिनिधींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या अधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, आमदार श्री. निलेशजी राणे, आमदार श्री. दिपकजी केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीषजी दळवी, जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक पतसंस्थांनी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचा आणि शुभेच्छांचे बॅनर लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बैठकीवेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. जॉय डॅन्टस, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव कविटकर, सावंतवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश बोंद्रे, तसेच समीर वंजारी, महेश्र्वर कुंभार, श्री. काकतकर, सुनील टेमकर, एव्हरेस्ट मेंडीस, जेम्स फर्नांडीस, गंगाराम सावंत, नारायण तेडोलकर, संगीता प्रभू, भिकाजी गवस, तृप्ती बखले, विनय आंदुर्लेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.