रत्नागिरी : मधला फगर वठार येथे बांधकाम व्यवसायिकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली;

ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मधला फगर वठार भागात रस्त्याच्या कडेला असलेली भलीमोठी संरक्षक भिंत आज मंगळवारी अचानक कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रस्त्याचा बराचसा भाग खचला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी बांधकाम व्यवसायिकाने या भिंतीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आणि खोलवर खोदाई केली होती. योग्य सुरक्षा उपाययोजना न करता केलेल्या या खोदकामामुळे भिंतीचा आधार कमकुवत झाला आणि आज ती कोसळली.

या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित बांधकाम व्यवसायिकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर बांधकाम व्यवसायिकावर कठोर कारवाई करण्याची आणि खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.