नुकसानभरपाईची मागणी
देवरूख (प्रतिनिधी) :
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-धोंगडवाडी येथे वन्यप्राण्यांचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. शनिवारी मंगेश सिताराम जाधव यांच्या मालकीच्या सुमारे एक वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पशुपालकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना घडल्यापासून स्थानिक ग्रामस्थ आणि पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी मंगेश जाधव यांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई त्वरित मंजूर करावी, अशी मागणी केली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या भागात तातडीने रात्रीची गस्त वाढवावी, तसेच हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचा व पाळीव प्राण्यांचा बचाव करण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करावे, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.












