यानिमित्ताने होणार शिवव्याख्याते बानगुडे पाटील यांचे व्याख्यान
संतोष कोत्रे
लांजा -: दहावी- बारावी तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा यामधील सुयश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता विद्यार्थी गुणगौरव आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण तरुणी, गृहिणी, शालेय विद्यार्थी यांना संगणक प्रशिक्षण, शिलाई प्रशिक्षण, मेहंदी ,पार्लर या सारख्या विविध प्रकारच्या शिक्षण प्रशिक्षणाची कवाडे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय पोलीस भरती अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो तरुणांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता गणेश मंगल कार्यालय ,लांजा येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमात इयत्ता दहावी आणि बारावी मधील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, तसेच शिष्यवृत्ती एमएमएस, मंथन या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच नासा इस्त्रोसाठी जाऊन आलेले विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक, तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेश भगवान सांबरे, तसेच इतिहास अभ्यासक ,लेखक आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील उपस्थित हे राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि भविष्यात मोठं ध्येय ठेवण्याची प्रेरणा देण्यासाठी हे व्याख्यान नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. एक विद्यार्थी घडला, तर एक कुटुंब घडतं
आणि हजारो विद्यार्थी घडले, तर संपूर्ण समाजाचं भविष्य घडतं! या उक्तीप्रमाणे खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचा लांजा शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ यांनी केले आहे.











