वार्तापत्र कोकण – संतोष वायंगणकर
कोणत्याही शासकिय योजना किंवा विचार केवळ कागदावर असून चालत नाही.त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी लागते.प्रयत्नाला मुहूर्त रुप आणावे लागते.ती राजकिय इच्छा शक्ती आणि अंमलबजावणीचा आग्रह हा महाराष्ट्राच्या मत्स्योद्योग मंत्रालयाचा राहीला आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यात कोकणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे.रेवस ते रेडी किनारपट्टीवरील अनेक प्रकल्पांनी आता गती घेतली आहे.
……………………….
कोकणातील किनारपट्टी १२१कि.मी.आहे.कोकणातील बोट वाहतूक बंद झाली आणि कोकणच्या किनारपट्टीला अवकळा आली. गेली चाळीस वर्षे कोकणची किनारपट्टी विकासाची प्रतिक्षा करत राहिली. तिला उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत असे नाही.प्रयत्न झालेच परंतु त्याला फार यश आले नाही. परंतू खऱ्या अर्थाने कोकणातील किनारपट्टी विकासाचा वेगळा विचार गेल्या दोन वर्षांपासून होऊ लागला आहे.कोकणच्या किनारपट्टीला मासेमारी,पर्यटनाबरोबरच येथील बंदरांना गाळ मुक्त करतानाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प मुर्त स्वरुपात आणण्यासाठी मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे यांच्या मेहनतीला यश येत आहे. मत्स्यव्यवसाय, बंदर विकासाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार आणि तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली.
कोणत्याही शासकिय योजना किंवा विचार केवळ कागदावर असून चालत नाही.त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी लागते.प्रयत्नाला मुहूर्त रुप आणावे लागते.ती राजकिय इच्छा शक्ती आणि अंमलबजावणीचा आग्रह हा महाराष्ट्राच्या मत्स्योद्योग मंत्रालयाचा राहीला आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील किनारपट्टी असलेल्या जिल्ह्यात कोकणच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे.रेवस ते रेडी किनारपट्टीवरील अनेक प्रकल्पांनी आता गती घेतली आहे. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय बंदराच्या पायाभूत सुविधां बरोबरच वाढवण बंदरासारखा विशाल प्रकल्प आकार घेत आहे. सिंधुदुर्गातील विजयदुर्ग, आनंदवाडी, रेडी बंदर असो वा अन्य बंदरे सर्वांना विकास प्रक्रीयेत गती देण्यात आली आहे. मिरकरवाडा, देवगड, आंजर्ले आणि कारंजा यांसारख्या मासेमारी बंदरांचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे.आनंदवाडी बंदराला पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यासाठी ८५ कोटीचा निधी मंजूर करुन घेण्यात मंत्री नितेश राणे यांना यश आले आहे.नुकतेच मच्छीमारांच्या भेटी घेत ना. नितेश राणे यांनी या बंदराच्या विकासासाठी प्रस्तावित २२ कामांबाबत सुचनाही दिल्या.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने विजयदुर्ग येथे ५०० कोटी रुपयांचा सर्व हवामानांत उपयुक्त ठरेल असा मायनर पोर्ट प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प मुंबई आणि जेएनपीटी बंदरांवरील ताण कमी करेल.तळवणे येथील ‘झोया मरीन’ जहाज बांधणी प्रकल्पाचे नुकतेच भुमिपुजन झाले. या कारखान्यात प्रामुख्याने अत्याधुनिक बोटींची निर्मिती केली जाईल आणि सुरुवातीला किमान २०० बोटी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
२०,००० कोटी रुपयांच्या विशाल ग्रीनफिल्ड जहाज बांधणी क्लस्टरसाठी रायगड दिघी या बंदरा दरम्यानच्या जागेची निवड अंतिम केली आहे.’आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका वेंगुर्ले येथील निवती रॉक जवळ समुद्रात बुडवून पर्यटनातील निलक्रांतीला गती देण्यात आली आहे.
कोकणच्या उत्तर टोकावरील रायगडमधील ‘रेवस’पासून ते पार दक्षिण टोकावरील सिंधुदुर्गातील ‘रेडी’पर्यंत पसरलेली किनारपट्टी जोडणारा सागरी महामार्ग हा या परिवर्तनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. या मार्गावरील खाड्यांवर महत्त्वाचे पूल उभारून वाहतूक सुलभ केली जात आहे. यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचत नाही, तर किनाऱ्यावरील लहान-मोठी गावे थेट मुख्य प्रवाहाशी जोडली जात आहेत.
महाराष्ट्राच्या मत्स्योद्योग मंत्रालयाच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे पारंपरिक मासेमारीला आता आधुनिक पायाभूत सुविधांची साथ मिळत आहे. केवळ निसर्गाचे सौंदर्य दाखवण्यापुरते मर्यादित न राहता कोकणातील पर्यटनाला व्यावसायिक व जागतिक दर्जा देण्याचे नियोजन अमलात येत आहे. वेळागर येथे पंचतारांकीत ताज हॉटेलच्या प्रकल्पाचेही काम आता सुरु होत आहे. असे अनेक प्रकल्प येत आहेत. काही येऊ घातले आहेत.
आपल्या गावात,खेड्यात युवा शक्ती थांबत नाही. रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतरील होणाऱ्या या पिढीला आता आपल्या भागात स्मार्ट नोकरी, स्मार्ट व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी ना. नितेश राणे यांचे या सरकारच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न यशदायी ठरतीलच.खासदार नारायण राणे, आ. निलेश राणे , सावंतवाडीचे आ. दिपक केसरकर , इकडे रत्नागिरी,रायगड येथील लोकप्रतिनिधी यांचे पाठबळ निश्चीतच मिळत आहे. यामुळे भविष्यात आपल्या कोकणात रिव्हर्स मायग्रेशन सुरु होईलच.
आता विरोधक प्रत्येक गोष्टीत काहीना काही किंतू परंतू काढत अडथळा आणण्याचे मनसुबे रचतीलही.. काहींनी तशी तयारी सुरुही केली असेल;आपल्या तरुण- तरुणींचे कौशल्यही पणाला लागणार आहे. मी हे कसे करु? मला हे काम जमणार नाही…असे म्हणत आपण संधी चुकवत गेलो तर मात्र वेळ कुणासाठी थांबत नाही अन संधी पुन्हा तुमच्या दरवाजा पर्यंत येईल असे होणार नाही…यामुळे आता कोकणवासीयांनी येत असलेल्या प्रकल्पांमध्ये आपल्याला सहभागी कसे होता येईल याचा विचार अन अभ्यास वेळीच केलेला बरा!













