वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
बेभरवशी लहरी वातावरणाचा परिणाम जसा शेती बागायतींवर होणारा आहे तसा तो कोकणातील पाणी समस्या वाढविण्यास हातभार लावणारा असणार आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले, सजलेले कोकण या अशा नैसर्गिक संकटांचा कसा सामना करायचा या विवंचनेत आहेत…
कोकणामध्ये आता पावसाने निरोप घेतला. आता पाऊस पडणार नाही असे वाटत असतानाच कोकणात पावसाने हजेरी लावली. कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं वातावरण होत. काही भागात भातकापणी केली जात आहे. या भातशेतीचे अगोदरच नुकसान झाले आहे. त्यात या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचीही दाणादाण उडाली आहे. मात्र, कोकणात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाचे अचानक येणं कोकणवासियांसाठी काहीस सुखावणार आहे. कोकणातही शासकिय पातळीवर जलनियोजन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधून १० टक्के इतकी पाणी कपात ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत सूचविण्यात आले आहे. १६ ऑक्टोबरपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी कपात धोरण अवलंबिण्यात आले आहे. १० टक्के पाणीसाठा बफर स्टॉक आपत्कालिन बफर स्टॉक म्हणून राखून ठेवण्यात येणार आहे.
कोकणात प्रशासकिय पातळीवर नियोजन करण्यात आले असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावो-गावी ग्रामस्थही पुढे येत आहेत. कच्चे बंधारे बांधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री ना. नितेश राणे, आ.निलेश राणे, आ.दिपक केसरकर यांनीही संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नदी, नाले, ओढे, ओहोळावर कच्चे बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात तुरळक पडलेल्या पावसाने काहीशा आशा पल्लवित झाल्या आहेत. आजवर कधी नव्हे अशी गंभिर समस्या भविष्यात निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजवर नैसर्गिक आपत्ती आली तरी कोकणवासिय नेहमीच या परिस्थितीचा सामना करत आले आहेत. परंतु १५० इंच इतका कोसळणाऱ्या पावसाच्या प्रदेशात पाणी टंचाईचे संकट उभं राहीलं असा विचार कोकणाने कधी केला नव्हता. ती बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या चार दिवसात पाऊस पडतोय हा तुरळक पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचय कसा करता येईल याचा विचार आणि नियोजन करण्यात आले पाहिजे.
मागील जवळपास दोन महिने पावसाने कोकणाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता पुन्हा पाऊस पडणार नाही. असेच शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु काही भागात का असेना पावसाने हजेरी लावली आणि एकीकडे भातशेतीचे नुकसान होत असताना थोडफार पाण्याचा संचय होईल असे वाटते. कोकणामध्ये कच्चे बंधारे बांधण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे. या सकारात्मक परिणामही निश्चितपणे दिसून येईल. कालपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार वनराई बंधारे बांधण्यात आले असल्याची माहीती ना. नितेश राणे यांनी जाहीर केली. ही बाब स्वागतार्ह आहेच . पण यापुढेही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची काळजीही आपल्याला घ्यायला हवीच. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच कोकणावरही अस्थिरतेचे सावट आहे. एकीकडे शेती बागायतीची नेमकी काय स्थिती राहील हे सांगणे कठीण होणारे आहे. वातावरणात सतत जे काही बदल होत आहेत त्यामुळे आंबा, काजू बागायतीचे काय होईल असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांना पडलेला आहे. एकीकडे पाऊस कमी झाला त्याबरोबरच यावर्षी थंडीचा हंगामही रडत रखडतच जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ आदी फळ पिकांना कडाक्याची थंडी आवश्यक असते. जर कडाक्याची थंडी कोकणात झाली तर निश्चितपणे आंबा, काजू आदि फळ पिक चांगली येऊ शकतात. गतवर्षीही आंबा, काजू बागायतदार शेतकरी योग्य प्रमाणात पिक न झाल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. गत दोन वर्षातील बागायतदार शेतकऱ्यांना जो आर्थिक तोटा सहन करावा लागल्याने त्यातून बाहेर पडलेले नाहीत. आर्थिक विवंचनेतून सावरलेले नाहीत. त्यामुळे यावर्षी तरी आंबा, काजू हंगाम चांगला जावा अशा अपेक्षेने आहेत. परंतु शेवटी नैसर्गिक लहरीपणावर आपल्या हाती काहीच नाही. थंडी कमीच प्रमाणात असेल असे म्हटले जातेय. त्याचवेळी यावर्षी कडक उन्हाळा असेल असे सांगितले जाते. शेवटी या बेभरवशी लहरी वातावरणाचा परिणाम जसा शेती बागायतींवर होणारा आहे तसा तो कोकणातील पाणी समस्या वाढविण्यास हातभार लावणारा असणार आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले, सजलेले कोकण या अशा नैसर्गिक संकटांचा कसा सामना करायचा या विवंचनेत आहेत. परंतु त्यावरही कशा पद्धतीने मात करता येईल. काय-काय उपाययोजना करता येतील त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतीलच. यात शंका नाही. शेवटी कोकणवासिय कधीच डोक्याला हात लावून रडत बसणारा नाही. तर संकटावर पाय देऊन उभा रहाणारा कोकणवासिय आहे. हेही दिवस जातील एवढं खरं.













