गुळदुवेत कोकण विकास संस्थेतर्फे फणस प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

 

बांदा (प्रतिनिधी) :    अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये फणस या फळाला महत्त्वाचे स्थान आहे. ४ जुलै हा जागतिक फणस दिन म्हणून साजरा केला  जातो. या निमित्ताने गुळदुवे ग्रामपंचायत येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत गुळदुवे यांच्या वतीने फणस प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गाला एकूण ४८ महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रशिक्षणामध्ये कापा व रसाळ फणसापासून पल्प, कराची हलवा, श्रीखंड व फणस वेफर्स इत्यादी पदार्थ बनवायला महिलांना शिकवण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गुळदुवे सरपंच शैलेंद्र जोशी, उपसरपंच अशोक धर्णे, प्रशिक्षिका प्राची धुरी, ग्रामसेवक स्वप्ना बगळे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली धर्णे, दिपगौरी मामलेकर, राजश्री जोशी, सीआरपी संगीता जोशी व किशोरी केदार, प्रा. गावडे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक भगवान चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकामध्ये समन्वयक भगवान चव्हाण यांनी कोकण संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कोकणात कापा आणि बरका हे प्रमुख दोन प्रकार आढळतात. केवळ काही सण कार्यक्रमा पुरते खपणारे फळ एवढीच फणसाची ओळख सीमित झाली असून या फळझाडाच्या व्यावसायिक लागवडीकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. सध्या बागायती किंवा इतर शेतीसाठी कळीच्या ठरणा-या हवामानातील बदलाचाही या फळझाडावर फारसा परिणाम होत नाही. फणसाच्या आधारावर व्यापक असा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. प्रक्रियाकृत पदार्थाना देशविदेशात मोठी मागणी आहे.

प्रशिक्षिका सौ.प्राची धुरी यांनी फणसाचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदिक फायदे सांगितले  अनेक दुर्धर आजारांवर फणस हा कसा गुणकारी हे सांगतानाच त्यांनी पिकलेल्या व कच्च्या फणसापासुन खाद्यपदार्थ बनविण्याच्या रेसिपी महिलांना सांगितल्या. रसाळ फणसाच्या गऱ्यापासून पल्प बनविणे व त्यानंतर त्या पल्पचा वापर करून कराची हलवा व श्रीखंड बनवायला शिकविले आणि कच्च्या फणसाच्या गऱ्या पासून वेफर्स कसे बनवावे हे महिलांना शिकविले. महिलांनी प्रात्यक्षिक करताना उस्फुर्त सहभाग घेतला.

सरिता शेटकर यांनी संस्थेचे आभार मानले. ग्रामसेविका स्वप्ना बगळे यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
—————