गोठणे येथे फार्मर आयडी नोंदणी कॅम्पला प्रतिसाद !

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील गोठणे गावामध्ये यशवंत वाडी येथे तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने ॲग्री स्टॅक नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. हंसराज जयसिंग देवकत यांनी कॅम्पचे आयोजन केले होते. सदर कॅम्प मध्ये 40 शेतकऱ्यांची फार्मर आयडी साठी नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत गावातील 240 शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढून देण्यात आले.यावेळी श्री देवकत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजना तसेच महाविस्तार ए आय ॲप संबंधी माहिती दिली. व या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यासाठी श्री देवकते यांना मालवण तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर ,

मंडळ कृषी अधिकारी आचरा श्री हुसेन आंबर्डेकर व उप कृषी अधिकारी श्रीमती राणी थोरात यांचे मार्गदर्शन मिळाले.

भविष्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केला जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रे तसेच कॅम्प चे ठिकाणी भेट देऊन आपली शेतकरी नोंदणी करून घ्यावी व भविष्यातील गैरसोय टाळावी असे आवाहन श्री अमोल करंदीकर तालुका कृषी अधिकारी मालवण यांनी केले आहे.