‘कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे’ यावर डॉ. अजित वर्तक यांचे आज व्याख्यान

लोटिस्मा’त होणार कोकणच्या जलव्यवस्थापनाचा तौलनिक विचार

चिपळूण  : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आज (शनिवार) सायंकाळी ६ वाजता ‘कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे’ या विषयावर डॉ. अजित वर्तक हे दृकश्राव्य संवाद साधणार आहेत. या निमित्ताने लोटिस्मा’त कोकणच्या जलव्यवस्थापनाचा तौलनिक विचार केला जाणार आहे.
डॉ. अजित वर्तक हे वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाशी जोडले गेलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहे. कंबोडिया हा भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. कंबोडिया, अंकोर साम्राज्य, तिथली प्राचीन मंदिरे, संस्कृती, त्यांचे कोकण प्रदेशाशी असणारे साम्य, अंकोर साम्राज्याचा ऱ्हास अशा अनेक गोष्टींच्या औत्सुक्याला समाधानकारक उत्तरे या व्याख्यानात नक्की मिळू शकणार आहेत. अंकोर साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि ह्रास याला कारण असणाऱ्या पाण्यासोबतच दगड, जमीन, हवामान, पाऊस या विषयांशी कंबोडियाचे कोकणाशी असणारे साम्य, कोकणाच्या भविष्यकालीन नियोजनासाठी नक्कीच दिशादर्शी असेल. कंबोडिया आणि कोकण याचा तौलनिक विचारही या व्याख्यानाच्या निमित्ताने होणार आहे. या अमूल्य व्याख्यान कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.